साकेडी (जि. सिंधुदुर्ग) गावामध्ये श्री लिंगेश्वर मंदिर परिसरात सापडल्या वीरगळ व सतीशिळा.

रत्नागिरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली-साकेडी गावामध्ये ग्रामदैवत श्री लिंगेश्वर व आई पावणादेवी व गांगोबा मंदिर आहे. यातील श्री लिंगेश्वर व गांगोबा मंदिरा शेजारी १५ प्राचीन ऐतिहासिक वास्तू सतीशिळा आढळून आल्या. आजतागायत अज्ञात ऐतिहासिक वास्तू संदर्भात ग्रामस्थांना काहीच माहिती व कल्पना नव्हती. या सापडलेल्या सतीशिळांचा इतिहास स्थानिक गावाशी कोणत्या संबंधाने जोडला गेलेला आहे. याचे संशोधन कार्य राहणार करजुवे (ता. संगमेश्वर) येथील इतिहास संशोधक, वीरगळ व सती शिळा अभ्यासक, कोकण दुर्ग अभ्यासक, मोडीलिपी जाणकार स्नेहल बने, यांनी करण्याचा प्रयत्न केला.

या कार्यामध्ये स्थानिक ग्रामस्थ मोडी लिपी जाणकार व महाराष्ट्रातील मंदिर स्थापत्य शैली अभ्यासक ॲड. अपूर्वा महादेव राणे यांचे मोलाचे सहकार्य व साथ मिळाली. ॲड. अपूर्वा राणे यांच्या सांगण्यावरून त्यांच्या गावात मिळालेल्या अज्ञात वास्तूंची कल्पना स्नेहल बने यांना मिळाली. दिनांक २५ मे २०२५ रोजी प्रत्यक्ष ठिकाणाची भेट घेतली असता या ऐतिहासिक वास्तू म्हणजे सती शिळा आहेत आणि त्याचे जतन संवर्धन झाले पाहिजे या उद्देशाने संवर्धन कार्य केले. प्रत्येक सती शिळेवर युद्ध प्रसंग, परंपरा, वेशभूषा, केशभूषा, अलंकार, काही प्राण्यांचे अंकन, धार्मिक पंथ, संप्रदाय, राजवटी चिन्हे अशा विविध प्रकारचे कोरीव अंकन आणि शिल्प आढळून आले. पुरातत्वीयदृष्ट्या वीर पुरुषांच्या बलिदानाचे पराक्रम व त्यांची इतिहासात असलेली नोंद पुढच्या पिढीला कळणे अत्यंत महत्त्वाची आहे. त्या अनुषंगाने अशा प्रकारच्या सतीशिळा, वीरगळ, स्मृतीशिळा यांचे जतन व संवर्धन योग्य पद्धतीने झाले पाहिजे, असे संशोधक स्नेहल बने यांचे मत आहे.तसेच या मंदिर परिसरामध्ये अज्ञात मूर्ती एका झुडुपाखाली दिसली.

ही मूर्ती कालभैरव याची असल्याचे श्रीमती बने यांनी स्पष्ट केले. या ऐतिहासिक वास्तूंसंदर्भात ग्रामस्थांना एकत्र करून स्नेहल बने व अपूर्वा राणे यांनी या वीर पुरुषांच्या सती गेलेल्या स्त्रियांच्या बलिदानाचे व त्यागाचे महत्त्व समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. या संशोधन कार्याला मंदिरातील पुजारी भिकाजी शंकर गुरव व राजाराम गुरव तसेच ग्रामस्थ शामसुंदर राणे, विजय राणे, मुरारी राणे, महादेव राणे व लक्ष्मण राणे या मंडळींनी उत्तमरित्या प्रतिसाद दिला व संवर्धन कार्यात सहभागी झाले. या संपूर्ण सती शिळांबाबत अधिकाधिक इतिहास गोळा करून व याची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आणि पुढील संशोधन करण्याचे काम स्नेहल बने यांनी हाती घेतले आहे. तसेच पुणे येथील नोंदणीकृत सह्याद्री ट्रेकर्स सामाजिक संस्था आणि भारत इतिहास संशोधक मंडळ यांच्याशी संलग्न असलेले वीरगळ आणि सतीशिळा शास्त्रज्ञ अनिल दुधाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील संशोधनाचे प्रयत्न चालू राहतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button