भाजीपाल्याची आवक घटली, महागाई तेजीत
रत्नागिरी ः उन्हाच्या झळा बसू लागल्याने भाजीपाला पिकाला पाणी कमी पडू लागले आहे. परिणामी शेतातील भाजीपाला पिकाचे उत्पादन घटले आहे. भाजीपाल्यांचे उत्पादन घटल्याने बाजारात भाजीपाल्याचे भाव कडाडले असून ग्राहकांच्या खिशाला आर्थिक झळ बसून गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
उन्हाळ्यात सर्वसामान्य ग्राहकांना भाजीपाला खरेदी करण्यासाठी आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. सर्व भाजीपाला घाटमाथ्यावरून येत असल्याने पुरवठा कमी पण मागणी जास्त असल्याने भाजीपाल्याचे दर गगनाला गेले आहेत. वांगी, दोडके, कोबी, कारली, काकडी, गवार, भेंडी, भोपळी मिरची आदी भाज्यांना पावकिलोसाठी १५ ते २० रुपये मोजावे लागत आहेत. तर काही ठिकाणी ८० रुपयांपर्यंत प्रतिकिलो दर भाजीसाठी मोजावे लागत आहे. टोमॅटोचा दर मात्र कमी असून तो २० रु. किलो दराने विकला जात आहे.