
सत्तेचा माज आलेल्यांनी शाखा पाडली ,यांची मस्ती निवडणुकीत उतरवून टाकू.: उद्धव ठाकरे यांचा घणाघात
आज येथे काही घडले असते, तर महाराष्ट्राची अब्रु गेली असती. यांना आता सत्तेची मस्ती आली आहे. काहींना सत्तेचा माज आलेला आहे. त्यामुळे त्यांनी शाखा पाडली. यांची मस्ती निवडणुकीत उतरवून टाकू.
आमच्या जागेवर अतिक्रमण केले आहे. तुमच्यात हिंमत असेल, तर पोलीस बाजूला करून समोर या, आमच्या कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लागला, तर केस उपटून टाकू, आम्ही लढण्यासाठी तयार आहे, असे आव्हान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता दिले.
शाखेपाशी ठेवलेला खोका उचला, अन्यथा फेकून देऊ. आमच्याकडे एकजणही भाड्याने कोण आलेला नाही. आज निश्चय करा, नेभळटांना थारा देणार नाही.
मुंब्रा येथे बुलडोझरने पाडलेल्या शिवसेनेच्या शाखेची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (दि.११) सायंकाळी ५.३० च्या सुमारास पाहणी केली. यावेळी ठाकरे गटाचे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. त्यामुळे येथे काही काळ तणावपूर्ण वातावरण बनले होते. तर यावेळी पोलिसांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यामध्ये वाद झाला. आव्हाड यांनी पोलिसांवर संताप व्यक्त केला. दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे येथे एकच गोंधळ उडाला.
www.konkantoday.com