
कोल्हापुरात सर्वाधिक! बारामतीत सर्वात कमी!! राज्यातील 11 मतदारसंघात सरासरी 55 टक्के
* पश्चिम महाराष्ट्रातील बारामती, सातारा, सांगली, हातकणंगले, कोल्हापूर, सोलापूर आणि माढा, मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद आणि कोकणातील रायगड व रत्नागिरी-सिंधुदुर्ग या ११ मतदारसंघात मंगळवारी उत्साहात मतदान पार पडले. रात्री आठ वाजता हाती आलेल्या आकडेवारीनुसार सरासरी ५४.९८ टक्के मतदान झाले. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामतीमध्ये मतदान कमी झाले असून कोल्हापूरात सर्वाधिक मतदान झाल्याचे चित्र आहे.बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातील अटीतटीच्या लढाईने मतदानाच्या दिवशी भावनिक रूप घेतले. सुळे यांनी अजित पवारांच्या घरी जाऊन त्यांच्या मातोश्रींचे आशीर्वाद घेतले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेक वर्षांत प्रथमच बारामतीत मतदानाचा हक्क बजावला. मात्र संध्याकाळपर्यंत कमी मतदान झाल्याने कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात मतदानाचा उत्साह सर्वाधिक होता. मतदान करण्याची वेळ संपली, तरीही काही केंद्रांवर रांगा होत्या. दोन्ही ठिकाणी ७० टक्क्यांहून अधिक मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. साताऱ्यात भाजपचे उदयनराजे भोसले आणि पवार गटाचे शशिकांत शिंदे यांच्यातील लढतीत चुरस दिसून आली. सातारा शहर, कोरेगाव आणि कराड परिसरात सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सांगलीत उन्हाचा कडाका असतानाही अनेक मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. माढ्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६० टक्क्यांच्या आसपास मतदान झाले होेते. सोलापुरात दुपारी ओस पडलेल्या मतदान केंद्रांवर सकाळी आणि सायंकाळी मात्र् रांगा लागल्याचे चित्र होते.लातूर व उस्मानाबाद या मराठवाड्यातील मतदारसंघांत पाच वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार मतटक्का घसरल्याचे दिसून येत आहे. मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे काही वेळ मतदान थांबण्याचे प्रकार दोन्ही मतदारसंघांत घडले.लातूर लोकसभा मतदारसंघातील अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव सांगवीच्या मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला. कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत दोन टक्के अधिक मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर रायगडमध्ये सुमारे ६२ टक्के मतदान झाल्याची शक्यता आहे. तांत्रिक बिघाडामुळे मतदान प्रक्रिया थांबल्याच्या किरकोळ घटना काही ठिकाणी घडल्या.www.konkantoday.com