
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौर्यावर आलेले आदित्य ठाकरे सात वर्षांनी मामाच्या घरी रमले
राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्याच्या निमित्ताने ते थेट मामाच्या गावी पोहोचले. तब्बल सात वर्षानंतर आदित्य ठाकरे मामाच्या गावी आले होते. मामाच्या घरी गेल्यावर झोपाळ्यावर बसून त्यांनी शहाळं घेतलं. देवाला गाऱ्हाणं घातलं. आजी, मामा-मामी आणि इतर नातेवाईकांची ख्याली खुशाली विचारली. भरपूर गप्पा मारल्या. जुन्या आठवणींना उजाळा दिला. मामांच्या मुलांसोबत सेल्फीही काढला. यावेळी त्यांच्या मामाने त्यांना आंब्याची पेटी देऊन त्यांचं स्वागत केलं. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत , आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, अरुण दुधवडकर आदी नेते उपस्थित होते. आदित्य ठाकरे बराचवेळ मामाच्या घरी होते. त्यानंतर ते पुढील दौऱ्याला निघाले.देवगड येथील दाभोळे या गावी पाटथर वाडीत आदित्य ठाकरे यांचे मामा प्रकाश पाटणकर राहतात. प्रकाश पाटणकर हे रश्मी ठाकरे यांचे चुलत बंधू आहेत. या ठिकाणी आदित्य ठाकरे सात वर्षानंतर आले. मामाच्या घरी आल्यावर आधी त्यांनी महापुरुषाचे (देव) दर्शन घेतलं आणि गाऱ्हाणं घातलं. त्यानंतर प्रकाश पाटणकर यांनी त्यांना शहाळ्याचे पाणी देऊन त्यांचं स्वागत केलं. घराच्या कलमाच्या आंब्यांची पेटी भेट दिली.आदित्य ठाकरे येणार म्हणून सगळं पाटणकर कुटुंब त्यांना भेटण्यासाठी उत्सुक होतं. आदित्य ठाकरे आल्यानंतर सर्वांचा चेहरा खुलून गेला. आजी, मामा, मामी, भावंड भेटली. त्यानंतर गप्पा रंगल्या. जुन्या आठवणींना उजाळा दिला गेला. ख्याली खुशाली विचारली गेली. आदित्य यांना कुटुंबीयांनी फोटो अलबम दाखवला. नंतर मोठ्यांनी आणि पोरासोरांनी आदित्य यांच्यासोबत फोटो काढले. सेल्फी घेतले आणि पुन्हा एकदा येण्याचे हक्काचे आमंत्रण दिले गेले.