
राजापुरात अर्जुना प्रकल्पाचा उजवा कालवा फुटला
राजापूर : मुसळधार पावसामुळे अर्जुनासह अन्य नद्यांना महापूर आला आहे. पूर्व तालुक्यातील अर्जुना प्रकल्पाचा उजवा कालवा फुटल्याने बाजूच्या भातशेतीचे नुकसान झाले आहे. सुमारे दोन हेक्टर क्षेत्रातील शेती वाहून गेली आहे
पूर्व परिसरात झालेल्या अतिवृष्टीमध्ये अर्जुना प्रकल्पाचा उजवा कालवा फुटून पाचल कोंडवाडीतील शेतात जाऊन भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये गोविंद राजाराम पवार, विकास सदानंद पवार, गोपाळ सिताराम पवार यांच्या शेतीचे नुकसान झाले. सुमारे दोन हेक्टर जमिनीवरील भातलावणी कालवा फुटल्याने वाहून गेली. संपूर्ण शेतात गाळ पसरला आहे. फुटलेल्या कालव्यापासून सुमारे दोनशे मिटर अंतरावर वस्ती असल्याने त्या वस्तीला धोका निर्माण झाला. तालुक्यात पडझडीच्या किरकोळ घटना घडल्या असल्या तरी सुदैवाने जीवित हानी झाल्याची घटना घडलेली नाही. सोमवारी राजापूर शहरात पुराचे पाणी जवाहर चौकापर्यंत आले होते. मात्र मंगळवारी पुराचे पाणी ओसरले होते. मात्र पाऊस पडत असल्याने पुन्हा शहरात पुराचे पाणी भरण्याचा धोका कायम होता.

