
शासकीय योजना जिल्हयातील शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहचवून जिल्हा सुजलाम-सुफलाम करु या – पालकमंत्री ॲड. अनिल परब
रत्नागिरी दि. 26 : शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना जिल्हयातील शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहचवून जिल्हा सुजलाम-सुफलाम करु या असे प्रतिपादन राज्याचे परिवहन, संसदीय कार्ये मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री ॲङ अनिल परब यांनी आज प्रजासत्ताक दिनी केले.
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअमवर पालकमंत्री अँड.अनिल परब यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम झाला. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव , जिल्हाधिकारी डॉ.बी.एन. पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
कोव्हीड-१९ च्या महामारीच्या काळात ज्यांनी समाजाचे आरोग्य राखण्यासाठी अपार मेहनत केली अशा सर्वांचा मी या प्रसंगी आवर्जून उल्लेख करतो असे सांगून पालकमंत्री म्हणाले कोव्हीड 19 च्या संकटातून आता आपण बाहेर पडण्याच्या मार्गावर आहोत, पंरतु अजून कोराना पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे सर्वांनी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांचे पालन करा. याआधी च सांगितल्याप्रमाणे वारंवार हात धुणे, मास्क वापरणे आणि सामाजिक अंतर ठेवणे या त्रिसुत्रीचा अवलंब करणे फार गरजेच आहे. शासनाकडून कोरोनाचा ससंर्ग टाळण्यासाठी आता लसीकरणावर भर देण्यात येत आहे. ज्या नागरिकांनी पहिला किंवा दुसरा डोस अजुनही घेतला नसेल त्यांनी तो घ्यावा असे आवाहन पालकमंत्री ॲङ परब यांनी यावेळी केले.
ते म्हणाले कोविड मुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटच्या नातेवाईकांना 50 हजार रुपये सानुग्रह सहाय्य योजना शासनाने आणली असून जिल्हयातील अंदाजे 866 पेक्षा जास्त जणांना त्याचा लाभ मिळाला आहे. ज्यांनी या योजनेंतर्गत लाभासाठी अर्ज केला नसेल त्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत. कोरोना प्रतिबंधित करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना शासनाकडून करण्यात येत आहेत. 15 व्या वित्त आयोगातील अबाधित निधीच्या 25 टक्के निधीला अधीन राहून कोविड विषयक बाबींसाठी खर्च करण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देखील चालू वर्षाच्या मंजूर 250 कोटींच्या 30 टक्के निधी राखून ठेवण्यात आला असून यामधून कोविड विषयक कामांसाठी खर्च करण्यात येत आहे.
ओमिक्रोन च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क असून कोरोनाच्या संकटाशी शासन खंबीरपणे लढत असून यामध्ये महसूल विभाग, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद आदि विभाग उत्तम काम करीत आहेत. भविष्यात जिल्हयात ऑक्सीजनची कमतरता भासणार नाही यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना आरोगय विभाग व प्रशासन करीत आहे.
कोविड, नैसर्गिक आपत्ती, चक्रीवादळ, तौक्ते व अलिकडील अतिवृष्टी या सर्व संकटांच्या मालिकेत प्रत्येकवेळी शासन आपल्या पाठीशी उभे राहिलेले आहे. निसर्ग चक्रीवादळातील बाधितांना नुकसान भरपाई देताना सर्व निकष बदलून शासनाने मदत केली. यावर्षी झालेल्या चिपळूण, खेड येथील पूरबाधितांना देखील शासनाकडून मदत करण्यात आली. आपत्ती दरम्यान व नंतरच्या काळात मदत करण्यासाठी विविध संस्था, संघटना पुढे आल्या व तातडीची मदत तसेच जीवनाश्यक वस्तूंचे वाटप केले याबद्दल पालकमंत्री महोदयांनी यावेळी सर्वांचे आभार व्यक्त करतो.
रत्नागिरी जिल्हा हा महाराष्ट्रातील 14 बहु आपत्ती प्रवण जिल्हयात येत असल्याने रत्नागिरी जिल्हयात नैसर्गिक व मानव निर्मित आपत्तींचे प्रमाण जास्त आहे. मान्सून कालावधीत महापूर, दरड कोसळणे, चक्रीवादळ, भूकंप इ. आपत्तीत तातडीच्या मदत व बचाव कार्यासाठी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत नाविण्यपूर्ण योजनेतून विविध उपक्रमांना मंजूरी देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये खेड नगरपरिषदेने उल्लेखनीय कामगिरी बद्दल देश पातळीवर 36 वा तर पश्चिम विभागातील पाच राज्यांमध्ये 16 वा क्रमांक नोंदविला आहे. तसेच दापोली येथील नारगोली धरण पुनरुजिवन मोहिम यशस्वी करुन येथील नगरंपचायतीने लोकसहभागातून पाणी टंचाईवर मात केली याबद्दल तिसऱ्या राष्ट्रीय जलपुरस्कार 2020 अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था विभागामध्ये दापोली नगरपंचायतीचा देशामध्ये दुसरा क्रमांक मिळल्याचे केंद्रीय जलशक्ती मंत्र्यानी जाहीर केले, याबद्दल पालकमंत्री महोदयांनी दापोली नगरपंचायत व खेड नगरपरिषदेचे अभिनंदन व कौतुक केले.
प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग योजना ही योजना असंघटीत क्षेत्रातील अन्नप्रक्रिया उद्योगासाठी 2021-22 ते 2024-25 या पाच वर्षाच्या कालावधीत एक जिल्हा एक उत्पादन या तत्वावार राबविली जात असून रत्नागिरी जिल्हयासाठी आंबा हे पिक निवडण्यात आले आहे. जिल्हयातील फळांवर आधारित अन्नप्रक्रिया उद्योगास मोठा वाव असल्याने जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या योजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी केले. प्रधानमंत्री फसल बीमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजनेत 24 हजार 33 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. यापैकी 22 हजार 668 शेतकऱ्यांना या योजनेतंर्गत नुकसान भरपाई देण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे हित जपण्यास शासनाचे कायमच प्राधान्य राहिलेले आहे.
रत्नागिरी जिल्हयामध्ये महाराजस्व अभियानांतर्गत शेतकऱ्यांना मोफत सातबारा वाटप करण्याची मोहिम 02 ऑक्टोबर 2021 पासून सुरु झाली असून आतापर्यंत जिल्हयातील 94 टक्के शेतकऱ्यांना मोफत सातबारा वाटप करण्यात आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडण्यासाठी राज्य शासनाने कृषीपंप विज जोडणी धोरण 2020 जाहीर केले आहे. कृषीपंप वीज जोडणी धोरणामध्ये कृषीपंप ग्राहकांना विज बिलाच्या व्याज आणि विलंब आकारात 66 टक्के पर्यंत सुट देऊन त्यांना विज बील कोरे करण्याची संधी उपलब्ध केली आहे, याचा आधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
पालकमंत्री म्हणाले पर्यावरणाचा कोणताही ऱ्हास न होता निसर्ग पर्यटनाचा विकास, स्थानिक लोकांच्या संस्कृतीचे जतन व रोजगाराला चालना देणे तसेच कांदळवनांचे संरक्षण व संवर्धन करणे या बाबी विचारात घेऊन चिपळुण वन विभागामार्फत कांदळवन उद्यान (Mangrove Park) निर्मितीचे काम हाती घेतले असुन रत्नागिरी जिल्हयातील कर्ला जुवे ता. रत्नागिरी येथे १४.७९ हेक्टर क्षेत्रावर रक्कम रु. १० कोटी व जुवे जैतापुर ता. राजापुर येथे १०.६० हेक्टर क्षेत्रावर रक्कम रु. १० कोटीची अशी एकुण रक्कम रु. २० कोटीची कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत.
जिल्हयातील कांदळवन कक्षामार्फत स्थानिक युवकांना रोजगार निर्मीती अंतर्गत खेकडा पालन, कोळंबी पालन, विविध रंगीत माश्यांचे उत्पादन करणे या बाबीकरीता वाव मिळणार आहे. सदर उद्यानामध्ये निसर्ग माहिती केंद्र, कांदळवन म्युझियम, तरंगते रस्त, जेटी, निरीक्षण मनोरे इत्यादी इतर कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत.
स्थानिक गरज तसेच कृषी, फलोत्पादन, पर्यटन, पर्यावरण इ. क्षेत्रांचा विकास करुन जिल्हयातील दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी सिंधुरत्न समृध्द योजना जाहिर करण्यात आली आहे. यामुळे जिल्हयामध्ये आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण होऊन पर्यायाने गावाचा विकास अधिक गतीने होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विकासाचा दृष्टिकोण ठेवून जिल्हयात असणाऱ्या सुंदर अशा सागरी किनाऱ्यांचा विकास करुन स्थानिकाना रोजगार आणि पर्यटनाला चालना असे नियोजन शासनाने केले आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत जिहयामध्ये मॅग्रोव्हज् पार्क व कांदळवन सफारी करिता House Boat त्याचबरोबर पर्यटकांना आकर्षित करण्याकरिता समुद्रकिना-यावर साहसी जलक्रिडा प्रकार, जिल्हयाचे पर्यटन संकेतस्थळ इ. उपक्रम हाती घेण्यात आले आहेत असल्याचे त्यांनी सांगितले.
चिपळूण तालुक्यातील डीबीजे महाविद्यालयाची विद्यार्थिनी दिशा पातकर हिची आज प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथील राजपथावरील संचलनासाठी निवड झाल्याबद्दल पालकमंत्री महोदयांनी तिचे अभिनंदन व कौतुक केले.
0000