
घटनाबाह्य सरकार सत्तेत असून न्यायालयाकडून त्यांना अभय देण्याचे काम सुरु- संजय राऊत
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या घरी जात त्यांच्या गणपतीचे दर्शन घेतले तसेच आरती केल्याचा एक व्हिडीओ शेअर केला होता. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा या भेटीवर टीका करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून एकामागून एक तारखा दिल्या जात आहेत. घटनाबाह्य सरकार सत्तेत असून न्यायालयाकडून त्यांना अभय देण्याचे काम सुरु आहे.” अशी टीका त्यांनी केली.लोकशाहीत पंतप्रधान आणि सरन्यायाधीश यांची अशाप्रकारे भेट घेणे अयोग्य आहे. सरन्यायाधीशांसमोर अनेक महत्त्वाचे राजकीय खटले सुरू असताना पंतप्रधानांनी त्यांच्या घरी जाणे आणि भेट घेणे अयोग्य आहे. यावरून पंतप्रधान मोदी यांच्या जाळ्यात सरन्यायाधीश अडकल्याचे दिसते,” अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली. ते पुढे म्हणाले, “या संबंधांमुळे आता आम्हाला न्याय मिळण्याची आशा नाही. त्यांचे फक्त तारखांवर तारखा सुरू आहे. राज्यामध्ये बेकायदा सरकार सत्तेत असताना फक्त पुढची तारीख मिळते. आता कदाचित सरन्यायाधीश निवृत्तीनंतर यावर भाष्य करतील.” असा टोला त्यांनी लगावला. तसेच, “आम्हाला न्यायालयात न्याय मिळाला नाही, तरी आम्हाला जनतेच्या दरबारात नक्की न्याय मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.