
आमदार निलेश राणे, माजी आमदार बाळ माने यांच्यासह तब्बल ४५० जणांविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल
रत्नागिरी शहरानजीकच्या एमआयडीसी येथे ९ महिन्यांपूर्वी जनावराचे शीर सापडल्याप्रकरणी सकल हिंदू समाजाच्यावतीने मोर्चा काढला आला होता. या मोर्चादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा भंग झाल्याच्या आरोपावरून निलेश राणेंसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.याप्रकरणी आमदार निलेश राणे, माजी आमदार बाळ माने यांच्यासह तब्बल ४५० जणांविरोधात सोमवारी (दि.२१) न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. ज्यांना न्यायालयातर्फे नोटीस बजावण्यात आली होती, त्यांची सोमवारी वैयक्तिक जातमुचलक्यावर मुक्तता करण्यात आली. याबाबत पुढील सुनावणी ११ जून रोजी होणार आहे.
जुलै २०२४ मध्ये एमआयडीसी परिसरात जनावराच्या शीर सापडल्याने मोठा गदारोळ निर्माण झाला होता. हिंदुत्त्ववादी संघटनांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. या प्रकरणातील आरोपींना अटक करा, अशी मागणी त्यावेळी लावून धरली होती. ही गोवंश हत्या असल्याचा आरोप त्यावेळी अनेक हिंदूत्ववादी संघटनांनी केला होता. याप्रकरणात आरोपींना पकडण्यासाठी ४८ तासांची मुदत देण्यात आली होती. याची गंभीर दखल आमदार निलेश राणे यांनी घेतली होती. ४८ तासांची मुदत संपल्यानंतर रत्नागिरीत सकल हिंदू समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात शेकडोंच्या संख्येने हिंदूत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चाचे नेतृत्त्व आमदार निलेश राणे यांनी केले होते.
पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चेकरी धडकणार होते. मारुती मंदिर येथून निघालेला मोर्चा पोलिसांनी अडवला. यावेळी पोलीस आणि मोर्चेकरी यांच्यात शाब्दिक चकमकीदेखील घडल्या होत्या. यावेळी जेल नाका परिसरात आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. दोन्ही मार्गावरील वाहतूक काही तासांसाठी खोळंबली होती. याप्रकरणी शहर पोलिसांनी आंदोलकांविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 189(2), 189(3), महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(1), 135 अन्वये गुन्हा दाखल केला होता.
याप्रकरणी सोमवारी रत्नागिरीतील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. यामध्ये आमदार निलेश राणे, माजी आमदार बाळ माने यांच्यासह चंद्रकांत श्रीधर राऊळ, राकेश नलावडे, नंदकुमार चव्हाण, राज परमार, स्वरुप पाटील, पराग तोडणकर, दत्तात्रय जोशी, अक्षय चाळके, स्वयम नायर, संतोष पवार, देवांग गोसावे, समर्थ पाटील, प्रेम पाटील, रोहित शिंदे, सागर कदम, गणेश गायकवाड, अथर्व दळी, सचिन नानिवडेकर, गौरव पावसकर, अद्वैत कुलकर्णी, राजेंद्र फाळके, संदीप नाचणकर, विराज चव्हाण, सचिन वहाळकर, राजेश तोडणकर, अमोल श्रीनाथ यांच्यासह सुमारे 400 ते 500 जणांचा समावेश होता. दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर ज्यांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. त्यांना वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडण्यात आले. याप्रकरणी न्यायालयात अॅड. भाऊ शेट्ये, अॅड. रत्नदिप चाचले, अड. स्वाती शेडगे, अॅड. सोनाली रहाटे, अॅड. निनाद शिंदे, अॅड. सचिन थरवळ यांनी संशयितांच्यावतीने काम पाहिले