
सोलापूर- धुळे महामार्गांवर असलेले आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या हॉटेल ग्रँड सरोवरला भीषण आग.
सोलापूर- धुळे महामार्गांवर असलेले आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या हॉटेल ग्रँड सरोवरला गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.अग्निशामक दलाच्या आठ बंब व दहा ते बारा टँकरच्या साहाय्याने तासाभरात ही आग आटोक्यात आणली.शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार प्रदीप जैस्वाल यांची सोलापूर- धुळे महामार्गावर तिसगावजवळ ग्रँड सरोवर हे सात मजली आलिशान हॉटेल आहे.
या हॉटेलमध्ये ६४ खोल्या आहेत. गुरुवारी रात्री शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. आग लागताच हॉटेलमधील ग्राहक व कर्मचारी तत्काळ बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली. दरम्यान, हॉटेल मालक आमदार प्रदीप जैस्वाल, ऋषिकेश जैस्वाल, माजी महापौर नंदकुमार घोडेले, पृथ्वीराज पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी बघ्यांचा मोठा जमाव जमला. तो पांगवताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.