
जिंदल गॅस टर्मिनलविरोधात नांदिवडेवासीयांचे १४ पासून बेमुदत धरणे आंदोलन
रत्नागिरी : तालुक्यातील जयगड नजीकच्या नांदिवडे येथील लोकवस्तीतून जिंदाल गॅस टर्मिनल स्थलांतरित व्हावे, या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलनाचे पत्र बुधवारी (९ एप्रिल) रोजी नांदिवडे येथील प्रदूषण विरोधी संघर्ष कृती समितीच्या वतीने उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे देण्यात आले. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून १४ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून पुढे जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
हे बेमुदत धरणे आंदोलन नांदिवडे येथे सध्या जिंदाल गॅस टर्मिनलचे काम सुरू आहे त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. या बेमुदत धरणे आंदोलनासाठी नांदिवडे येथील प्रदूषण विरोधी संघर्ष कृती समितीला व स्थानिक ग्रामस्थांना सुप्रीम कोर्टाचे नामवंत वकील ॲड. असीम सरोदे, प्रहार जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू, कायदेशीर सल्लागार ॲड. रोशन पाटील , कायदेशीर सल्लागार ॲड. महेंद्र मांडवकर आदींचे विशेष सहकार्य लाभणार आहे. या बेमुदत धरणे आंदोलनासंदर्भात रत्नागिरी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय येथे निवेदन देताना प्रदूषण विरोधी संघर्ष कृती समितीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
नांदिवडे येथे गेल्या काही महिन्यांपूर्वी गॅस टर्मिनल मुळे वायू गळतीची मोठी दुर्घटना घडली होती. याचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांना बसला होता. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी मोठ-मोठी आंदोलने केली. तसेच हा गॅस टर्मिनल लोकवस्तीतून हटवण्यासाठी सातत्याने मागणी केली; परंतु तरीदेखील हा गॅस टर्मिनल जिंदाल कंपनीने हटवलेला नाही. त्यामुळे आता प्रदूषण विरोधी संघर्ष कृती समिती नांदिवडे यांचे वतीने येत्या १४ एप्रिलपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.