
विधवा प्रथा बंद करण्यासाठी जिजाऊ ब्रिगेडचा पुढाकार
चिपळूण : येथील जिजाऊ ब्रिगेडतर्फे विधवा प्रथा बंद करण्याबाबत खेर्डी, कापसाळ, कळंबस्ते ग्रामपंचायतींना दि. 21 रोजी निवेदन देण्यात आले. यावेळी जिजाऊ ब्रिग्रेडच्या जिल्हा उपाध्यक्षा स्नेहल चव्हाण, कार्यकर्त्या रुपा पवार, अॅड. स्मिता कदम, संभाजी ब्रिगेड महिला तालुका उपाध्यक्ष स्नेहल पवार, सामाजिक कार्यकर्त्या संध्या साळुंखे उपस्थित होत्या. पतीच्या निधनानंतर अंत्यविधीवेळी पत्नीच्या कपाळावरील कुंकू पुसले जाते, तसेच मंगळसूत्र काढले जाते. महिलेच्या पायातील जोडवी काढून टाकली जातात. कायद्याने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा समान अधिकार आहे. परंतु ते अधिकार आजतागायत या विधवा महिलांना मिळालेले नाहीत, म्हणजे कायद्याचा भंग होत आहे. तरी आपल्या गावामध्ये महिलांना सन्मानाने जगता आले पाहिजे याकरिता विधवा प्रथा बंद करण्यात यावी. यासंदर्भात गावामध्ये आपण जनजागृती करावी, यासाठी जिजाऊ ब्रिग्रेडतर्फे हे निवेदन दिले आहे.