
रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांसाठीचार कोटी 31 लाखाचा डिझेल परतावा मंजूर.
रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांसाठी 4 कोटी 31 लाखाचा डिझेल परतावा मंजूर झाला असून, त्याचे वितरण नुकतेच पूर्ण झाले आहे. सध्या मासळी कमी मिळत असल्याने त्रस्त मच्छीमारांना दिलासा मिळाला आहे. अजून ११०० नौकांचा १० कोटीचा डिझेल परतावा येणे बाकी आहे; मात्र मच्छीमार नौकांची तपासणी मुदतीत झाली नसल्यामुळे आणि संस्थांनी नौकांचा परिपूर्ण तपासणी अहवाल सादर न केल्यामुळे काही मच्छीमार बोटींना डिझेल कोट्यापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात नोंदणीकृत सुमारे अडीच हजाराहून अधिक मासेमारी नौकांना डिझेल परतावा मिळतो. त्याचा लाभ घेण्यासाठी सोसायटीमार्फत मच्छीमारांना मत्स्यविभागाकडे प्रस्ताव सादर करावा लागतो. मागील वर्षापर्यंत सुमारे ५० कोटीपर्यंतची रक्कम थकीत होती; परंतु गेल्या वर्षभरात शासनाकडून परताव्यासाठी वेळोवेळी तरतूद करण्यात आली होती. परिणामी, मच्छीमारांचा परताव्याच बॅकलॉग भरून निघाला आहे. आठच दिवसांपूर्वी ४ कोटी ३१ लाख रुपये जिल्ह्याला मिळाले होते. त्यामुळे शिल्लक रकमेमध्ये घट झाली आहे.