
विरोधी पक्षनेते पदाचा तिढा कायम, भास्कर जाधवांना इतर पक्षांकडून अजूनही पाठिंबा नाहीच
विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना ठाकरे गटानं पाठवलेल्या भास्कर जाधव यांच्या नावाला पाठिंबा देणारे पत्र महाविकास आघाडीतील अन्य पक्षांनी दिले नाही.उलट काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांनी लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. काँग्रेसचे विजय वड्डेटीवार, नाना पटोले, नितीन राऊत या पदासाठी उत्सुक असल्याची माहिती समोर आली आहे.विधानसभेतील सदस्यसंख्येच्या किमान १० टक्के बळ असलेल्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद देण्यात येतं. त्यानुसार, ठाकरे गटानं विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीबाबात पत्र पाठवले. मात्र, त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जोडपत्र नाही.
एकट्या शिवसेना ठाकरे गटाकडे १० टक्के म्हणजेच २८ आमदार नाहीत. त्यामुळे नियमावली तपासल्या जात आहेत.आता शिवसेनेनं विरोधी पक्षनेते पदासाठी दावा केला आहे. मात्र, काँग्रेसनं याला पाठिंबा दिला नाही. जर मविआतील सहकारी पक्षांनी पाठिंब्याचे पत्र दिल्यास सदस्यसंख्येचा निकष पूर्ण होईल. मात्र, महाआघाडीतील नेत्यांनी पाठिंबा आहे, पण पत्राची गरज नाही, असं सांगत ते दिलेच नाही. दरम्यान, काँग्रेसनं लोकलेखा समितीचे अध्यक्षपद आम्हाला द्या, असा आग्रह धरला आहे.