
कर्जप्रकरणासंबंधी नोटीस पाठवल्याने बँक कर्मचार्याच्या कानशिलात लगावली
कर्जप्रकरणासंबंधी नोटीस पाठवल्याच्या रागातून बँक कर्मचार्याला शिवीगाळ करत कानशिलात लगावली. ही घटना शुक्रवारी युको बँक रत्नागिरी ते नवलाई मंदिर नाचणेदरम्यान घडली. रवीकिरण बालासाहेब टेळे असे युको बँक कर्मचार्याचे नाव आहे. या प्रकरणी त्यांनी रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी या प्रकरणी अनंत गजानन शिंदे याच्याविरूद्ध शासकीय कामात अडथळा करून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
रवीकिरण टेळे हे रत्नागिरी युको बँक येथे काम करतात. संशयित आरोपी अनंत शिंदे यांना बँकेने एका कर्जप्रकरणासंबंधी नोटीस धाडली होती. या बँकेची नोटीस आलेली समजताच अनंत शिंदे यांच्या रागाचा पारा चढला. याचा जाब विचारण्यासाठी ३ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास अनंत शिंदे हे थेट युको बँकेच्या शाखेत धडकले.
बँकेत प्रवेश करताच अनंत शिंदे यांनी बँकेचे कामकाज सुरू असताना मला नोटीस कशी काय पाठवली. तुम्हाला काय अधिकार आहे, नोटीस पाठविण्याचा असे बोलून शिंदे यांनी गोंधळ घातला. कर्मचार्यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तसेच रागाच्या भरात शिंदे हे ताडकन बँकेतून बाहेर पडले. या प्रकारानंतरही शिंदे यांच्या मनात बँकेने आपल्याला नोटीस पाठविल्याचा राग मनामध्ये धुमसत होता. याच रागातून शिंदे यांनी पुन्हा बँक कर्मचार्याला धडा शिकविण्याचा निर्णय घेतला. सायंकाळी ६.४५ च्या सुमारास युको बँक कर्मचारी रवीकिरण टेळे हे बँकेतून घरी जात होते. टेळे हे गाडी चालवत नवलाई मंदिर नाचणे येथे आले असता अनंत शिंदे यांनी आपली गाडी टेळे यांच्या गाडीसमोर लावली. टेळे यांना काही समजायच्या आतच अनंत शिंदे यांनी रवीकिरण टेळे यांच्या कानशिलात लगावली तसेच पुन्हा माझ्या वाटेत याल तर लक्षात ठेवा, अशी धमकी दिली.
www.konkantoday.com