
नाणीज शोभायात्रेतील पाच सर्वोत्कृष्ट पथकांना पुरस्कार सोहळ्याचा उत्साह शतपटीने वाढविणारी शोभायात्रा
नाणीज, दि. २२ :- येथे २० फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या संत शिरोमणी श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा आणि आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य जयंती सोहळ्या निमित्त नाणीज क्षेत्री भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. त्यातील सर्वोत्कृष्ट पुरस्कारासाठी ५ पथकांची निवड झाली आहे.भारतातील विविध राज्यांतील लोककला आणि समाज प्रबोधन करणारे अनेक चित्ररथ या शोभायात्रेत सहभागी झाले होते. यामध्ये उत्कृष्ट देखावा सादर करणाऱ्या पथकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. या देखाव्यामध्ये प्रथम क्रमांक स्व स्वरूप सांप्रदायाच्या मुंबई पीठ महिला सेनेच्या लेझीम पथकाला जाहीर झाला आहे.
एकूण पाच पुरस्कार जाहीर झाले आहेत. जगद्गुरु रामानंदचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही शोभायात्रा काढण्यात आली. महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, गोवा, छत्तीसगड, तेलंगणा येथून आलेल्या साठ पेक्षा सुद्धा अधिक पथकांनी सहभाग घेतला होता. जवळजवळ साडेतीन तास ही मिरवणूक चालली होती. त्यात स्वतः जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज, प.पू. कानिफनाथ महाराज सहभागी झाले होते. त्यांनी रथातून शोभायात्रेची पाहणीदेखील केली. देशभरातील प्रमुख आखाड्यांच्या साधुसंतांचे रथदेखील यात सहभागी होते.
लोककला, संस्कृती, नृत्य, वाद्य, प्रबोधन अशी सर्व प्रकारची पथके यात सहभागी होती. दूरदूर वरून आलेल्या या पथकांनी नयनरम्य व आश्चर्यकारक दृश्ये सादर केली.ही शोभायात्रा बघण्यास हजारोजण रस्त्याच्या दुतर्फा थांबले होते. सर्वांनी जल्लोष, जयघोष करीत त्याचा आनंद घेतला. पुरस्कार जाहीर झालेले सर्व देखावे आकर्षक होते. लोकांची मने त्यांनी जिंकली होती.
यामध्ये निवड झालेली सर्वोत्तम पथके – १) प्रथमक्रमांक – मुंबई पीठ महिला सेनेचे लेझीम पथक. २) द्वितीय क्रमांक – नाशिक जिल्ह्यातील युवक व युवतींनी साकारलेला मरणोतर देहदान देखावा. ३) तृतीय क्रमांक पथकांना विभागून – अ) छत्रपती संभाजीनगर – कुंभमेळा देखावा. ब) सिंधुदुर्ग – समुद्र मंथन देखावा. क) गोंदिया – शिवतांडव देखावा.
सर्वच देखावे उत्तम होते. त्यामुळे यामधून उत्कृष्ट देखाव्यांची निवड करताना निवड समिती साठी मोठी कसोटीच ठरलीहोती. विजेत्यांना श्रीरामनवमी वारी उत्सवात पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.