
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्यावर खासदार संजय राऊत कमालीचे नाराज
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्कार देऊन त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्यावर ठाकरे गट कमालीचा नाराज झाले आहे.एरवी शरद पवार यांच्याविषयी आदराने बोलणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरुन पवारांना प्रथमच खडे बोल सुनावले. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली. त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नव्हते पाहिजे. ही आमची भावना आहे. आम्ही महाराष्ट्रातील लोकांसमोर कोणत्या तोंडाने जाणार? राजकारणात कोणी कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो. पण ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली, आम्ही ज्यांना महाराष्ट्राचे शत्रू समजतो. त्यांच्यासोबत खुलेआम बसणे आणि त्यांना असे सन्मान आपल्या हातून देणं ही योग्य गोष्ट नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. ते बुधवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी संजय राऊत यांनी शरद पवार यांनी दिल्लीतील कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार करणे ही महाराष्ट्राच्या अस्मितेला आणिस्वाभिमानाला धक्का लावणारी गोष्ट आहे. कदाचित पवारांची भावना वेगळी असेल, आपण ज्येष्ठ नेते आहात, आम्ही आपला आदर करतो. पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अमित शाहांच्या सहकार्याने तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला अशांना आपण सन्मानित करता. यामुळे मराठी माणसाच्या हृदयाला वेदना झाल्या असतील. आम्हाला तुमचं दिल्लीतील राजकारण माहिती नाही. पण आम्हालाही राजकारण कळतं, माननीय पवार साहेब, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. राजकारणात काही गोष्टी टाळायला पाहिजेत. तुमचं आणि अजित पवार यांचं गुफ्तगू होत असेल, तो तुमचा कौटुंबिक प्रश्न आहे. अजित पवारांनी तुमचा पक्ष फोडला, कुटुंब फोडलं, याचं भान राखून आम्ही पावलं टाकतो, असेही संजय राऊत यांनी म्हटले.