सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारांसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत परिपूर्ण अर्ज करा – सहायक आयुक्त दीपक घाटे
रत्नागिरी, दि. 6 : सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कुवारबाव येथे सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण दीपक घाटे यांनी केले आहे.
सामाजिक न्याय विभागामार्फत समाज कल्याण क्षेत्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन मिळावे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहू-फुले-आंबेडकर पारितोषिक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार यांचे नावाने पुरस्कार देवून व्यक्ती व संस्थांना सन्मानपूर्वक गौरविण्यात येते.
शासनाने सन २०२३-२४ या वर्षातील ६ पुरस्कारांची दि. १ फेब्रुवारी रोजी परिपूर्ण जाहिरात वृत्तपत्रात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तरी जिल्ह्यातील सर्व पात्र सन्माननीय व्यक्ती व संस्थांनी दि. १५ फेब्रुवारीपर्यंत आपले विहीत नमुन्यातील परिपूर्ण अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कुवारबांव, ता. जि. रत्नागिरी (दूरध्वनी क्र. ०२३५२-२३०९५७) येथे सादर करावेत. यानंतर येणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.000