
शिवसेनेच्या वतीने शहरातील जयस्तंभ परिसरात फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष.
रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले उदय सामंत आणि राजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले किरण सामंत यांच्यासाठी शिवसेनेच्या वतीने शहरातील जयस्तंभ परिसरात फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला. शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या शिल्पा सुर्वे म्हणाल्या, यावेळी बोलताना या सरकारने महिलांसाठी, वृद्धांसाठी तरुणांसाठी चांगल्या, कल्याणकारी योजना आणल्या आहेत आणि म्हणूनच जनतेने या सरकारला भरघोस मतांनी निवडून दिले आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत हीच आम्हा रत्नागिरीतल्या भगिनींची इच्छा आहे.
शिवसेनेचे शहर प्रमुख बिपीन बंदरकर म्हणाले, उदय सामंत यांच्यासाठी महायुतीत असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याने प्रचंड मेहनत घेतली आहे आणि म्हणून ते १ लाख ११ हजार इतकी मते घेऊ शकले. त्याचप्रमाणे राज्यात महायुतीला २३३ जागा मिळाल्या. यात उदय सामंत यांचाही मोलाचा वाटा आहे. राज्यभर सामंत यांच्या प्रचाराचा झंझावात होता. म्हणूनच प्रत्येक ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला चांगले मताधिक्य मिळाले. यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. एकनाथजी शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पद मिळावे यासाठी रत्नागिरी शिवसेनेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.