नवजात बाळाच्या पोटात एक नव्हे तर दोन मृत अर्भक, गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी!
बुलडाण्यामध्ये बाळाच्या पोटात बाळ असल्याची दुर्मिळ घटना समोर आली होती. या दुर्मिळ घटनेतील महिलेची नुकताच सुरक्षित प्रसुती करण्यात आली. बुलडाणा जिल्हा महिला रुग्णालयात शस्त्रक्रिया करून महिलेची यशस्वी प्रसुती करण्यात आली. त्यानंतर या बाळाला आणि आईला पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठवण्यात आले होते. याठिकाणी नवजात बाळाच्या पोटातील बाळ बाहेर काढण्यात आले. या बाळाच्या पोटामध्ये एक नव्हे तर दोन मृत अर्भक होते ते यशस्वी शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्यात आले.*मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाण्यातील त्या नवजात ३ दिवसांच्या बाळावर अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्या नवजात बाळाच्या पोटात एक नाही तर दोन मृत अर्भक निघाले. दोन्ही अर्भक तीन इंचाचे होते.
त्या नवजात बाळाच्या पोटात दोन्ही अर्भकाचे शरीर तयार झाले होते.५ डॉक्टर, ४ नर्स आणि इतर कर्मचारी यासह १२ जणांनी या नवजात बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. बाळाच्या पोटाला १२ टाके पडले. शस्त्रकियेनंतर नवजात बाळाची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. एका पुरुष जातीच्या नवजात पोटातून २ अर्भक निघणे ही देशात आतापर्यंतची ही पहिलीच घटना आहे. या बाळावर शस्त्रक्रिया करणं हे डॉक्टरांसमोर मोठं चॅलेंज होतं. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर बाळाच्या वडिलांनी डॉक्टरांचे आभार मानले.
दरम्यान, महिलेच्या पोटातील बाळाच्या पोटातही बाळ असणं या परिस्थितीला फिटस इन फिटो असं वैद्यकीय भाषेत म्हटले जाते. हे अतिशय दुर्मिळ अशी परिस्थिती असून आतापर्यंत जगात फक्त २०० तर आपल्या देशात ९ ते १० अशा घटना समोर आल्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील इतिहासात बुलडाण्यात पहिल्यांदा अशा प्रकारची घटना समोर आली आहे. या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.