
मद्यधुंद चालकाचे नियंत्रण सुटले, थेट रेल्वे रुळावर नेली कार; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
कर्नाटकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील टेकल रेल्वे स्थानकावर दारुच्या नशेत एका व्यक्तीने स्थानकाच्या आवारात कार घुसवली. इतकंच नाही, तर त्या व्यक्तीने चक्क प्लॅटफॉर्मवरुन थेट रेल्वे रुळावर कार आणली.सुदैवाने यावेळी कुठलीही रेल्वे रुळावर न आल्याने मोठा अनर्थ टळला.
दारुच्या नशेत कारवरील नियंत्रण सुटले
मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्याने कार थेट रेल्वे प्लॅटफॉर्मवर आणली. इथेच न थांबता त्याने त्याची मारुती स्विफ्ट डिझायर कार चक्क रेल्वे रुळावर नेली. ही घटना कळताच लोकांचा जमाव घटनास्थळी पोहोचला, रेल्वे अधिकाऱ्यांनाही याची माहिती देण्यात आली.
याबाबतची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळताच तात्काळ जेसीबीला मागवुन गाडी रेल्वे रुळावरून हटवण्यात आली. यावेळी कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र तो दारुच्या नशेमुळे कारमध्ये बेशुद्ध पडला होता. घटनेनंतर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.