शासनाच्या ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ अंतर्गत चिपळूणच्या लो.टि.स्मा.त वाचक मेळावा संपन्न.
चिपळूण :: शासनाच्या ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमा अंतर्गत येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर येथे नुकताच वाचक मेळावा बाळशास्त्री जांभेकर सभागृहात संपन्न झाला. यावेळी वाचन कक्ष, संदर्भासाठी वाचनालयाची अमूल्य उपलब्धी, वाचकसंख्या, पुस्तक प्रदर्शने, वाचन संकल्प मेळावा आदींवर चर्चा झाली.यावेळी कार्याध्यक्ष धनंजय चितळे यांनी वाचनालयाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. वाचक सभासद संख्या वाढविण्याबाबत त्यांनी उपस्थित वाचकांना आवाहन केले. वाचनालयाच्या वाचक सभासदांनी यावेळी आपली मते मांडली. वाचनालयाचे आजीव सभासद सुबोध दीक्षित यांनी दर तीन महिन्यांनी पुस्तकांचे प्रदर्शन भरवले पाहिजे असे सांगितले. डॉ. रत्नाकर थत्ते यांनी वाचनालयात वाचन कक्षची आवश्यकता बोलून दाखवली.
श्रीमती विशाखा चितळे, सौ. नांदगावकर, प्रफुल्ल रेडिज यांनी वाचनालयाचे कर्मचारी चांगल्या प्रकारे सेवा देत असल्याचे सांगितले. प्रत्येक महिन्यात नविन येणारी पुस्तके आणि मासिके दर्शनी भागात ठेवावीत अशी सूचना करण्यात आली. संतोष देसाई, मधुसूदन केतकर, जयंत जोशी यांनीही वाचक संख्या वाढविणेबाबत विचार व्यक्त केले. वाचनालयाचे कार्यवाह विनायक ओक यांनी वाचनालयाच्या विविध उपक्रमांत सहभागी होण्याची विनंती केली. वाचनालयाची भूमिका सांगितली. अल्पोपहार आणि चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी वाचनालयाचे आजीव सभासद आणि संचालक उपस्थित होते.