
वेत्ये – तिवरे समुद्रकिनारी कासवांची १ हजार अंडी संरक्षित
राजापूर तालुक्यातील वेत्ये तिवरे येथील समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले या कासवाची अंडी सापडली असून येथील कासवमित्र गोकुळ जाधव यांनी मागील १५ ते २० दिवसात १ हजार ९ अंडी हॅचरीमध्ये संरक्षित केली आहेत. वाडातिवरे, वेत्ये आणि आंबोळगडचा किनारा सागरी कासवांच्या विणीसाठी प्रसिद्ध आहे. नोव्हेंबर ते मे हा सागरी कासवांचा विणीचा हंगाम असतो. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यातच वेत्ये तिवरे किनारी पहिल्यांदाच कासवाची अंडी सापडली होती.
मात्र यावर्षी काहीसा उशिराने कासव अंडी देण्यासाठी समुद्रकिनारी दाखल झाल्याचे पहायला मिळत आहे. तर यंदाच्या कासव विणीच्या हंगामातील पहिले घरटे वेत्ये या ठिकाणी २५ डिसेंबर २०२४ रोजी सापडले होते. त्यामध्ये कासव मादीने १३० अंडी घातलेली आहेत.वेत्ये तिवरे समुद्र किनार्यावर मोठ्या प्रमाणात अंडी सापडण्यास सुरूवात झाली आहे. येथील कासवमित्र गोकुळ जाधव यांना आतापर्यंत १० घरट्यांमध्ये सुमारे १ हजार ९ अंडी संरक्षित केली आहेत. याकरीता त्यांना राजापूर वनपाल जयराम बावदाने, वनरक्षक विक्रम कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले.www.konkantoday.com