
कुवारबावच्या घंटा गाडीचा प्रस्ताव गटविकास अधिकाऱ्यांकडे 23 महिने धूळ खात पडून; निधी मंजुरीला टाळाटाळ; पाठपुरावा कोण करणार?
घनकचरा निर्मूलन प्रकल्पासाठी जिल्हा प्रशासनाकडून रेखांकनात मंजूर असलेली जागा हस्तांतरित करण्यात चालढकल सुरूच
रौप्य महोत्सवी वाटचाल पूर्ण करणाऱ्या कुवारबाव ग्रामपंचायतीची जिल्हा प्रशासनाकडून सतत उपेक्षाच, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
रेखांकनात कचरा प्रकल्पासाठी मंजूर असलेली जागा हस्तांतरित करण्यात नेमका कोणाचा गुप्तपणे विरोध?
संतापलेले कुवाऱबाव ग्रामस्थ आता तीव्र आंदोलनाच्या तयारीत
: रत्नागिरी शहराचे उपनगर बनलेल्या आणि रौप्य महोत्सवी वाटचाल पूर्ण करणाऱ्या कुवारबाव ग्रामपंचायतीच्या घनकचरा निर्मूलन प्रकल्पासाठी जिल्हा प्रशासनाकडून रेखांकनात मंजूर असलेली जागा हस्तांतरित करण्यात चालढकल सुरूच आहे. तर दुसरीकडे घंटागाडीसाठी जिल्हा नियोजनातून आर्थिक निधीची मागणी करणारा प्रस्ताव ग्रामपंचायतीने २५ फेब्रुवारी २०२३ रोजी गटविकास अधिकाऱ्यांना पाठवूनही त्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात अक्षम्य दिरंगाई होत आहे. कुवारबावच्या रहिवाशांची पंचायत समिती, जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून सातत्याने उपेक्षा सुरू आहे. लोकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी या यंत्रणांकडे वेळ नाही की हे काम करण्याची मानसिकता नाही, असा सवाल केला जात असून कंटाळलेले ग्रामस्थ आता तीव्र आंदोलनाच्या तयारीत आहेत. तसा इशारा देण्यात आला आहे.
नजीकच्या कर्ले आणि मिरजोळे ग्रामपंचायतीही स्वतःच्या घंटागाडीतून गोळा केलेला कचरा रत्नागिरी एमआयडीसीतील रत्नगिरी या खत कंपनीत जमा करीत आहेत. मात्र कुवारबाव ग्रामपंचायत आणि स्वतःचा घनकचरा निर्मूलन प्रकल्प मार्गी लागेपर्यंत घंटा गाडी घेऊन एमआयडीसीतील कचरा प्रकल्पात कचरा टाकण्यासाठी रत्नागिरी जिल्हा नियोजन विभागाकडे केलेली घंटागाडीच्या निधीची मागणीही दोन वर्ष होऊन गेली तरी मार्गी लावली जात नाही. दरम्यान घंटागाडी येईपर्यंत रत्नागिरी खत कंपनीने स्वतःच्या गाडीतून कुवारबाव येथील कचरा गोळा करून घेऊन जाण्याची तयारी दर्शविली आहे.
त्यासाठी ग्रामस्थांच्या आग्रहामुळे दिनांक 23 जानेवारी रोजी कुवारबाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रशासक श्रीमती समीक्षा तळेकर आणि ग्राम विकास अधिकारी श्री. अर्जुन नागरगोजे आणि कंपनीच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत येथील सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी आणि रहिवाशांची बैठक ग्रामपंचायतीने घेतली आणि हा प्रस्ताव पुढे केला आहे. मात्र कंपनी फक्त सुका कचराच संकलित करणार असल्याने ग्रामपंचायतीने तोपर्यंत स्वतःची घंटागाडी आणून सुका आणि ओला कचरा संकलित करण्यासाठी घंटागाडीचा तातडीने पाठपुरावा करावा, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. कुवारबाव उपनगरात वाढती लोकसंख्या आणि वाढत्या गृहनिर्माण वसाहती, वाढती बाजारपेठ यामुळे घनकचरा निर्मूलन व्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. ग्रामस्थ कचरा उघड्यावर टाकत असल्यामुळे दुर्गंधी निर्माण झाली.
मोकाट कुत्री आणि गुरांचा उपद्रव वाढला आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशन जवळील रेखांकनात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी राखीव ठेवलेली जागा मिळण्यासाठी ग्रामपंचायत जिल्हाधिकाऱ्यांकडे गेली दोन-तीन वर्ष पाठपुरावा करत आहे. मात्र जिल्हा प्रशासन सदर जागा हस्तांतरित करण्यात चालढकल करीत आहे. या संदर्भात पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्याकडेही रहिवासी सातत्याने निवेदन देऊन पाठपुरावा करीत आहेत. पालकमंत्र्यांनी स्टरलाइट प्रकल्पाच्या जागेत होणाऱ्या घनकचरा प्रकल्पात कुवारबाव ग्रामपंचायत क्षेत्रातील कचरा सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तोही प्रकल्प मार्गी लागत नाही आणि कुवारबावची घनकचरा प्रकल्पासाठी रेखांकनात राखीव असलेली हक्काची जागा देण्याबाबत जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.
तसेच घंटागाडीच्या निधीलाही मंजुरी दिली जात नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थ आता आक्रमक बनले असून लवकरच मोठे आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहेत. पालकमंत्री नामदार सामंत यांनी या प्रश्नात आता तरी गांभीरपणे लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.कुवारबावच्या रहिवाशांनी रत्नगिरी कंपनीच्या मोबाईल नंबर 8390925402 वर संपर्क साधून नाव नोंदणी केल्यास कंपनीकडून पूर्वसूचना देऊन फक्त सुका कचरा संकलित करण्यासाठी वाहन पाठविले जाईल, असे कंपनीच्या प्रतिनिधीने बैठकीत सांगितले. त्यामुळे ओल्या कचऱ्याचा प्रश्न ग्रामपंचायतीची घंटागाडी येईपर्यंत कायम असणार आहे. याबद्दल उपस्थित रहिवाशांनी नाराजी व्यक्त करून ग्रामपंचायतीने स्वतःची घंटागाडी तातडीने उपलब्ध करून घ्यावी अशी बैठकीत मागणी केली.घंटा गाडीचा प्रस्ताव पाठवून दोन वर्षे होत आली तरी त्यावर कार्यवाही नाही.
गटविकास अधिकाऱ्यांनी काय कार्यवाही केली याचा खुलासा करावा, अशी मागणी होत आहे. प्रस्ताव पाठवून दोन वर्षे झाली तरी पंचायत समितीचे प्रशासन झोपा काढत आहे काय? कुवारबाव ग्रामपंचायतीने कोणताही पाठपुरावा केला नाही, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. मिरजोळलेला घंटागाडी मिळते आणि कुवारबावला मिळत नाही याचे खरे कारण काय याचे उत्तर मिळालेच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका आता कुवारबाव ग्रामस्थांनी घेतली असून याबाबत तातडीने निर्णय झाला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. जे काम मिरजोळे ग्रामपंचायत करते ते रोप्य महोत्सवी वाटचाल करणारी कुवारबाव ग्रामपंचायत का करू शकत नाही.
घंटागाडीचा प्रस्ताव गटविकास अधिकाऱ्यांकडे 23 महिने धूळ खात पडून आहे. त्याचा पाठपुरावा कोण करणार? आमचे लोकप्रतिनिधी काय करत होते? आता प्रशासकांची काही जबाबदारी नाही का, असे सवाल विचारले जात आहेत. *रेखांकनात कचरा प्रकल्पासाठी मंजूर असलेली जागा हस्तांतरित करण्यात एका तथाकथित स्थानिक नेत्याचा गुप्तपणे विरोध आहे आणि हा नेता जाहीरपणे बोलताना आपला कोणातही विरोध नसल्याचा कांगावा करीत असल्याची चर्चा गावात सुरू आहे.*