अखेर सहकार नगरच्या टाकीचे दुरुस्तीचे काम सुरू.. भाजपाने दिला होता आंदोलनाचा इशारा..
रत्नागिरी : रत्नागिरी शहरामधील सहकार नगर नाचणे रोड प्रभाग क्रमांक ६ मध्ये असलेली पाण्याची टाकी या टाकीला गेली अनेक वर्षे गळती लागली होती. या टाकीचे दुरुस्तीचे काम आठ महिन्यापूर्वीच मंजूर झाले होते. मात्र कोणत्या ना कोणत्या कारणांनी दुरुस्तीचे काम लांबणीवर जात होते. प्रभागातील स्थानिकांच्या मागणीनुसार स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी याबाबत रत्नागिरी नगर परिषदेला पत्रही दिले होते. एवढेच नाही तर भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी थेट टाकीवर चढून आंदोलन करू असा इशारा दिला होता. मात्र मुख्याधिकारी बाबर यांनी पुढील आठ दिवसात टाकीचे काम सुरू होईल असा शब्द देताच भाजपाने हे आंदोलन थांबविले होते.
आता मात्र प्रत्यक्ष या टाकीच्या कामाला सुरुवात झाली असून सध्या थेट मुख्य लाईनीवरून प्रभागातील भागांना पाणीपुरवठा होत आहे. या टाकीच्या कामानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल असे जाणकारांचे मत आहे. जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा पदाधिकारी शैलेश बेर्डे यांनी प्रत्यक्ष जाऊन या टाकीच्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी देखील केली. भाजपा पदाधिकारी यांनी टाकीचे काम सुरू झाल्याने प्रशासनाचे आभार मानले आहेत. तर स्थानिक रहिवाशांनी देखील याबाबत भाजपा पदाधिकारी यांना धन्यवाद दिले.