श्री देव भार्गवराम, परशुराम देवस्थान इनाम जमीनभूसंपादनातील ५० टक्के मोबदला कुळांना, १० टक्के देवस्थानला तर ४० टक्क्यांची ठेव


*रत्नागिरी, दि. २९ (जिमाका) : चिपळूण तालुक्यातील मौजे पेढे व परशुराम ही दोन गावे देवस्थान इनामातील असून, राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या रुंदीकरणामध्ये संपादीत झाली आहेत. जागेच्या एकूण मोबदल्यापैकी ५० टक्के मोबदला कुळांना, १० टक्के देवस्थान समितीला आणि उर्वरित ४० टक्क्यांचा मोबदला प्रशासनाच्या नावे ठेव ठेवण्याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
परशुराम गावातील विविध भूसंपादन मोबदला वाटप व जमीन हक्क संदर्भात काल रात्री चिपळूण येथील रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पत पेढी च्या सभागृहात बैठक घेण्यात आली. बैठकीला आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, माजी आमदार सदानंद चव्हाण उपस्थित होते. यावेळी देवस्थान समितीचे पदाधिकारी व कुळ उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सामंत यांनी सर्वांशी चर्चा करुन निर्णय जाहीर केला. उर्वरित रकमेची ठेव प्रशासनाच्या नावे ठेवण्यात येणार आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
*१४ घरे तिवऱ्यात, उर्वरित २६ घरे अलोऱ्यात*
तिवरे (भेंदवाडी) येथील धरणग्रस्त कुटुंबियांच्या घरासंदर्भातही बैठक झाली. या बैठकीत १४ घरे तिवरे येथे बांधायची, तर उरलेली १९ व पेढे परशुराम भूस्खलनातील ७ घरांचे पुनर्वसन अशी एकूण २६ घरे अलोरे येथे बांधण्याची सूचना पालकमंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. या बैठकीला तिवरे ग्रामस्थ उपस्थित होते.
चिपळूण शहर विकास कामासंदर्भात आढावा
पालकमंत्री श्री. सामंत यांनी चिपळूण शहर विकास कामांसदर्भात आढावा बैठक घेतली. मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी यावेळी सविस्तर आढावा दिला. ते म्हणाले, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र नुतनीकरणाचे अडीच कोटीचे काम पूर्ण झाले आहे. क्रीडा संकुल सिंथेटिक कोर्ट बनविणे तसेच सिंथेटिक कोर्टावरती विद्युतीकरण करणे प्रगतीपथावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळ्याच्या सभोवती, भिंतीवर दगडी अच्छादन करणे व उर्वरित सुशोभिकरणाचे काम याबाबत आदेश देण्यात आला असून, १० नोव्हेंबरपासून कामास सुरुवात होणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button