मुंबई ते गोवा’ अंतर कमी होणार, NHAI कडून नव्या एक्स्प्रेसवेची घोषणा.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच एनएचएआयद्वारे नवा द्रुतगती महामार्ग उभारला जाणार आहे. हा एक्स्प्रेसवे जेएनपीटीजवळच्या पागोटे ते जुन्या पुणे महामार्गावरील चौक जंक्शनपर्यंत असणार आहे.अंदाजे ३० किमी लांब एक्स्प्रेसवे प्रकल्पासाठी ३,७०० कोटी रुपये खर्च येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी ३० महिने (साधारण अडीच-तीन वर्ष) इतका कालावधी लागेल असे म्हटले जात आहे.
एनएचएआयचे प्रादेशिक व्यवस्थापक अंशुमाली श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या एक्स्प्रेसवेमुळे एमटीएचएलहून (अटल सेतू) गोव्याला जाणाऱ्या महामार्गापर्यंतचा प्रवास फक्त ३० मिनिटांत पूर्ण होईल. परिणामी मुंबई ते गोवा अंतर अर्ध्या तासाने कमी होणार आहे. हा द्रुतगती महामार्ग उरण-चिरनेक महामार्ग, गोवा महामार्ग आणि पुणे द्रुतगती महामार्ग यांसारख्या महामार्गांना जोडला जाईल. तर पुढे अलिबाग-विरार मल्टीमॉडेल कॉरिडोर, मुरबाड-जुन्नर महामार्ग, नाशिक महामार्ग आणि समृद्धी महामार्ग यांनाही हा नवा द्रुतगती महामार्ग जोडला जाईल अशी माहिती समोर आली आहे.