हातखंब्यानजीक कारने अवजड ट्रेलरला मागून धडक दिल्याने भीषण अपघात, एक जण ठार.
गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर हातखंब्यानजीक रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ कारने अवजड ट्रेलरला मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कारचालक ठार झाला. नितीन श्रीकांत शिरवळकर (रा. मुंबई ) असे ठार झालेल्या कार चालकाचे नाव आहे.अपघाताची सविस्तर माहिती अशी शनिवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीहून हातखंब्याजवळ ट्रक (जीजे 27 टिएफ 6818) हा गोव्याहून नवी मुंबईकडे चालला होता. त्याला मागून येत असलेल्या कार ( एमएच 01 एएक्स 9281) ने जोरदार धडक दिली. त्यात कारचालक नितीन श्रीकांत शिरवळकर, रा. मुंबई गंभीर जखमी झाला.
या घटनेची माहिती मिळताच श्रीक्षेत्र नाणीज येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची हातखंबा येथील रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. त्यातून जखमीला तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरनी त्याला मृत घोषित केले.दोन्ही वाहनांची धडक मोठी होती. त्यात कारच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा झाला आहे.