लॉस एंजेलिसमध्ये भीषण आग अन् नोरा फतेही हॉटेलमध्ये अडकली.
अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधील जंगलातील आगीत आतापर्यंत १० जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. लॉस एंजेलिस काउंटीमधील ही आगाची घटना आतापर्यंतची सर्वात विनाशकारी आहे.या आगीत सुमारे १० हजार इमारती जळून खाक झाल्या आहेत. या आगीत काही हॉलिवूड सेलिब्रिटींची घरेही नष्ट झाली आहेत. लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या या आगीदरम्यान बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही हॉटेलमध्ये अडकून पडली होती. तिने याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
लॉस एंजेलिसमधील आगीच्या घटनेदरम्यान नोरा फतेहीने तिथल्या परिस्थितीबद्दल सांगितले आहे. तिथल्या आगीमुळे तिला आणि तिच्या टीमला हॉटेल सोडण्यास सांगण्यात आले, असे नोराने व्हिडिओमध्ये म्हटले आहे. जवळपास दोन मिनिटांच्या व्हिडिओमधून तिने तिथली परिस्थिती दाखवली आहे.नोरा कामाच्या निमित्ताने लॉस एंजेलिसला गेली होती. तिने इंस्ट्राग्राम स्टोरीजमधून धगधगच्या आगीचे दृश्य दाखवले आहे. नोरा म्हणते की, “मी लॉस एंजेलिसमध्ये आहे आणि इथले जंगल भीषण आगीत जळत आहे. मी असे दृश्य कधीच पाहिले नव्हते. आम्हाला पाच मिनिटांपूर्वीच हॉटेल सोडून जाण्याचा आदेश मिळाला. म्हणून मी माझे सर्व साहित्य लगेच पॅकिंग केले आणि मी आता येथून बाहेर पडत आहे. मी विमानतळाजवळ जाऊन तिथे आराम करेन. कारण आज माझी फ्लाईट आहे आणि मला आशा आहे की मला फ्लाईट वेळेत मिळेल.”