इस्मत आपा के नाम! नंदिनी देसाई

कधी कधी एखादा लेखक सहज वाचनात येतो आणि मग झपाटल्यागत त्या लेखकाचं सर्व लेखन वाचावंसं वाटू लागतं. कविता महाजन यांनी अनुवाद केलेला इस्मत चुगताई यांच्या रजई या पुस्तकाच्या बाबतीत असंच झालं. हा कथासंग्रह वाचला आणि चक्रावून गेल्यासारखं दोनचार दिवस झालं. मग गूगलबाबाला साकडं घालून इस्मत चुगताई यांचं उपलब्ध असलेलं सारं साहित्य महिन्याभरामध्ये वाचून टाकलं. त्यांचं जीवनचरित्र म्हणता येईल असं टेढी लकीर वाचून तर आपण या लेखिकेला इतके दिवस का वाचले नव्हते असा प्रश्न पडला.

उर्दू लेखनामध्ये एक मानदंड मानता येईल अशी ही लेखिका. समाजामधला दुहेरीपणा, अप्पलपोटेपणा, धूर्तपणा त्यांच्या कथांमध्ये ठायी ठायी आढळतो. त्यांची अनेक पात्रं ही अप्पलपोटी आहेत, आणि त्याचवेळी ती असहाय्य देखील आहेत. पल्लेदार वाक्यांमधून परिच्छेद लिहिण्याची फॅशन होती त्याकाळातही त्यांचं लेखन हे गप्पा मारल्यासारखं संवाद साधणारं होतं. आजूबाजूचा मध्यमवर्ग त्यांच्या कथांमध्ये प्रतिबिंबित झालेला दिसत राहतो.

“काळाच्या पुढे असणारा लेखक” अशी पदवी अनेक लेखकांना दिली जाते, पण इस्मत चुगताई यांचे लेखन खर्‍या अर्थाने काळाच्या पुढे होते. किंबहुना आजच्या काळामध्ये समाजासाठी अशा लेखिकेची नितांत गरज आहे. त्यांचे लेखन हे कायमच कालातीत राहणारे आहे. अलिगढ युनिव्हर्सिटीमधून पदवी घेणारी आणि त्यानंतर स्वतंत्र लेखन करणारी ही मुलगी लहानपणापासूनच स्वतंत्र विचारांची होती. चूल्हाचक्की मेरा काम नही म्हणत मोठी झालेली इस्मत जेव्हा लिहू लागली, तेव्हा वाचकवर्गाला वाटलं की कदाचित हिचा मोठा भाऊच हिच्या नावाने लिहितो आहे, कारण अझीम बेग चुगताई हेदेखील तेव्हाचे मोठे लेखक होते. पण जश्या इस्मत यांच्या कथा प्रसिद्ध होऊ लागल्या, तशा त्यामधला स्वतंत्र स्वातंत्र्यवादी आणि धाडसी विचार कर्मठ लोकांना सहन होणे शक्यच नव्हते. 1940 मध्ये लग्न होऊन त्या मुंबईत आल्या.

त्यांचे पती शहीद लतीफ हे सिनेमा निर्माते होते. इस्मत चुगताई यांनी कथा कादंबरीसोबत सिनेमा लेखन आणि दिग्दर्शनही केले. हिंदी सिनेमांमध्ये फार कमी स्त्री दिग्दर्शक होऊन गेल्या आहेत त्यापैकी एक इस्मत चुगताई. त्यांनी लिहिलेले अनेक सिनेमा आजही आपल्याला आठवत असतील. त्यांनी लिहिलेल्या सिनेमांपैकी जिद्दी (देव आनंद कामिनी कौशल), आरजू (दिलीप कुमार) आणि सोने की चिडिया (नूतन- तलत महमूद) ही काही महत्त्वाची नावं. 1973 साली आलेल्या गरम हवाचे कथालेखन त्यांनी कैफी आझमी यांच्यासोबत केले होते. शहीद लतीफ आणि इस्मत आपा यांचे मित्र असणारे अजून एक संवेदनशील लेखक म्हणजे सआदत हसन मंटो. 1955 मध्ये मंटो यांचे अकाली निधन झाले. त्यावेळी सर्व जनमानसाला आलेला शोकाचा उमाळ पाहून इस्मत चुगताई भडकल्या होत्या. स्पष्टपणे त्यांनी लेखक मेल्यावर त्याच्याबद्दल कळवळा काढण्यापेक्षा जिवंत असताना त्यांचे लेखन समजून घ्या, असे मत मांडले.

आपले लेखन लोकांपर्यंत पोचायला हवे आणि त्यावर लोकांनी विचार करावा अशी त्यांची कळकळ होती. 1991 मध्ये आजारपणामध्येही त्या लिहत राहिल्या. कागझी की पैरहन ही त्यांची अधुरी राहिलेली आत्मकथा मरणोत्तर प्रसिद्ध झाली. अल्झायमरसारख्या आजाराशी लढतानाही त्यांची विचारशक्ती अबाधित राहिली. मृत्यूनंतर त्यांना दफनविधी नको हवा होता, त्यामुळे असे म्हणतात की त्यांच्या इच्छेनुसार त्यांना मुंबईमधील चंदनवाडी स्मशानामध्ये दहन करण्यात आले.

आयुष्यभर धगधगते विचार वारंवार मांडत राहिलेल्या या अजरामर लेखिकेला जाताना आपला देहदेखील अशाच धगधगत्या अग्नीच्या हवाली करावासा वाटला यात नवल काहीच नाही. मात्र, आजही त्यांचे विचार अनेक कलाकारांना खुणावत आहेत. त्यांच्या कलाकृती आजही वाचकांना वाचाव्याशा वाटत आहेत, त्यावर काम सुरू आहे. उर्दूमध्ये आपा हे नाव मोठ्या बहिणीसाठी वापरतात, आपण कसं ताई अक्का म्हणतो तसं. त्याच मायेने इस्मत चुगताई या समस्त वाचकांसाठी आपा झाल्या आहेत. एखाद्या भाषेमधले विचार जेव्हा त्यांची सीमा लांघूनही इतर वाचकांपर्यंत पोचतो तेव्हा तो सार्वत्रिक बनत जातो. यासाठी लिखण केवळ धाडसी असून चालत नाही, तर ते अधिकाधिक सजग आणि अस्सलही असावे लागते.

इस्मत आपा यांचे लेखन याच मुशीतून घडलेले होते. आजवर कधी इस्मत आपा यांचे लेखन अनुभवले नसेल तर *रत्नागिरीकरांसाठी 4 फेब्रुवारीला होणारे नाटक ही एक अमूल्य संधी आहे. एका आगळ्यावेगळ्या, प्रागतिक लेखन लिहिणार्‍या लेखिकेची कलाकृती अनुभवण्यासाठी हे नाटक पहायलाच हवे आहे*.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button