
“दाऊदला फरफटत आणणार होता, मग वाल्मिकला अजून अटक का नाही केली?” आव्हाडांचा फडणविसांना सवाल!
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील चार आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत. या प्रकरणाचा तपास सीआयडी करत असून गेल्या तीन दिवसापासून सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी जिल्ह्यात तळ ठोकून आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड या प्रकरणात आरोपी आहे, मात्र अद्याप जाणीवपूर्वक त्याच्यावर कारवाई होत नसल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
“लोकांची मेमरी शॉर्ट आहे. लोकं विसरून जातील. याची ते वाट पाहत आहेत असे आव्हाड म्हणाले. ३०२ मध्ये वाल्मिक कराड यांचं नाव नाही. मोक्का लावू असं सभागृहात सांगितलं होतं मात्र अद्याप काहीच हालचाली नसल्याचे आव्हाड म्हणाले. आका काका म्हणणारा नाही, मी थेट धनंजय मुंडे यांचे नाव घेणार. या हत्याप्रकरणी ३०२ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्यामध्ये वाल्मीक कराडचे नाव नाही. बीड प्रकरणामध्ये आपल्या पक्षातील एका मंत्र्यावर सातत्याने आरोप होत आहेत.
त्यामुळे पक्ष अध्यक्ष म्हणून त्या मंत्र्याचा राजीनामा घेणे हे अजित पवार यांचे कर्तव्य होते,” असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटले.*वाल्मिक कराड हा सरकारपेक्षा मोठा…*“मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बोलताना बीड प्रकरणाची न्यायाधीशांद्वारे चौकशी होईल आणि आरोपींवर मोक्का लावला जाईल, असं आश्वासन दिलं होतं. मात्र यावर काहीच हालचाल दिसत नाही. खरंतर २४ तासांत ते फाईल व्हायला हवं होतं. सत्ताधारी दाऊदला फरफटत आणणार होते, पण वाल्मिकला ते आणू शकले नाहीत. पॉलिटिकल अंडरस्टॅन्डींग शिवाय हे शक्य नाही. त्यामुळे वाल्मिक कराड हा सरकारपेक्षा मोठा आहे, असे वातावरण त्यांनी तयार केले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यभरातील अर्ध्याहून अधिक बूथ रिव्हॉल्वरधारी लोकांनी कॅप्चर केले होते.
पण माध्यमांसमोर हे कधी आले नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यात लोकशाहीसाठी ही अत्यंत वाईट गोष्ट आहे,” असेही जितेंद्र आव्हाड यांनी बोलताना सांगितले.
“अजित पवारांनी अद्यापपर्यंत कोणतीच जबाबदारी घेतलेली नाही. उलट सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा आमदार सुरेश धस यांना डोळ्याने खुणावले होते. यामागे त्यांचा उद्देश काय होता? हे मला समजले नाही. ज्यावेळी शरद पवार साहेबांचे सरकार होते, त्यावेळी अण्णा हजारेंनी आरोप केल्यावर शरद पवारांनी सुरेश जैन, नवाब मलिक, पद्मसिंह पाटील, विजयकुमार गावीत यांचे राजीनामे घेतले होते,” अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र धनंजय मुंडेंकडून वाल्मिक कराडला पाठीशी घातलं जात असल्याचंही नेत्यांनी म्हटलं होतं. परंतु आता वाल्मिक कराड शरण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.