
फेरोसिमेंट’ तंत्रज्ञानाने मंडणगड तालुक्यात प्रथमच कुंबळे येथे ‘रेन वाॅटर हार्व्हेस्टींग टॅंक’
जलवर्धिनी प्रतिष्ठानचा पुढाकारः10 हजार लिटर पावसाचे पाणी साठणार!
मंडणगड( प्रतिनिधी):’फेरोसिमेंट’ तंत्रज्ञानाने मंडणगड तालुक्यात ग्रामपंचायत कुंबळेच्या कार्यक्षेत्रात प्रथमच ‘रेन वाॅटर हार्व्हेस्टींग टॅक’ बांधण्यात आली असून यासाठी जलवर्धिनी प्रतिष्ठान,मुंबईने पुढाकार घेतला आहे.
या टाकी बांधण्याच्या कामाची पाहणी पंचायत समिती मंडणगडचे गट विकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे व कृषी अधिकारी विशाल जाधव यांनी करून फेरोसिमेंट तंत्रज्ञान समजून घेतले. व फेरोसिमेंटच्या तंत्रज्ञानाने बांधण्यात आलेल्या ‘रेन वाॅटर हार्वहेस्टींग टॅक’ बांधणारे शेतकरी संदेश लोखंडे व जलवर्धिनी प्रतिष्ठानचे कौतुक केले.यावेळी कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर ,ग्रामसेवक शरद बुध,ग्रा.पं.सदस्या सौ.समिक्षा लोखंडे,संदेश लोखंडे उपस्थित होते.
जलवर्धिनी प्रतिष्ठान ही ‘रेन वाॅटर हारव्हेस्टींग’ या विषयात काम करणारी सामाजिक संस्था आहे. रत्नागिरी जिल्हयात गेल्या 4 वर्षात सुमारे 30 पेक्षा अधिक टाक्या ‘फेरोसिमेंट टेक्नाॅलाॅजी’चा वापर करून जलवर्धिनीने बांधल्या आहेत. रत्नागिरी जिल्हयात सुमारे 3000 ते 3500 मिलीमिटर पाऊस पडतो. म्हणजेच 3 ते 3.5 मिटर किंवा 10 फूट उंचीची कोणतीही टाकी केवळ पडणा-या पावसाच्या थेंबाने भरू शकते. कोकणात मुसळधार पाऊस पडतो.पावसाचे हे पाणी समुद्राला जाऊन मिळते. पावसात एवढया मोठ्या प्रमाणात पाऊस पडून पावसाळ्यानंतर डोंगराळ भागात किंवा अनेक ठिकाणी फळझाडांना पाणी देण्यासाठी,वापरण्यासाठी पाणी संकलन करण्याची व्यवस्था नसते.
ज्या उपाययोजना किंवा इतर पद्धतीने केलेल्या टाक्या ह्या पाणी साठवण्याच्या तुलनेत अधिक खर्चिक असतात.
त्यामुळे जलवर्धिनी प्रतिष्ठान,मुंबईने ‘फेरोसिमेंट टेक्नालाॅजी’चा वापर करून 8 हजार ते 15-16 हजार लिटर पाणी साठी शकेल,अशाप्रकारच्या ‘रेन वाॅटर हार्वहेस्टींग टॅक’ रायगड,ठाणे,पालघर जिल्हयात व रत्नागिरी जिल्ह्यातील इतर तालुक्यात बांधल्या आहेत.
मंडणगड तालुक्यात जलवर्धिनी प्रतिष्ठानचे प्रतिनिधी म्हणून पंचायत समिती,मंडणगडचे कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली कुंबळे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात संदेश लोखंडे यांच्या शेतावर या 10 फूट व्यास व 5 फूट उंचीची सुमारे 10,000 लि.पावसाचे पाणी साठणारी टाकी बांधण्यात आली. या टाकीचे बांधकाम स्थानिक कारागीर सुरेश पवार यांनी केले. मंडणगड तालुक्यात फेरोसिमेंट तंत्राचा वापर करून प्रथमच नाविन्यपूर्ण रेन वाॅटर टॅकचे काम आमच्या कुंबळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात केल्याबद्दल सरपंच किशोर दळवी यांनी जलवर्धिनी प्रतिष्ठानबद्दल समाधान व्यक्त केले व आभार मानले.
फेरोसिमेंट हे मॅजीक तंत्रज्ञान- गजेंद्र पौनीकर फेरोसिमेंट तंत्रज्ञान हे मॅजीक तंत्रज्ञान आहे. सिमेंट,वाळू,चिकनमेश,वेल्डमेश,स्टील चा वापर करून आपले साधे कारागीर या तंत्राने ह्या टाक्या बांधू शकतात. या तंत्रज्ञानाने आपण बायोगॅस, टाक्या बांधू शकतो.काही ठिकाणी तर छोटी घरे व शौचालयेसुद्धा या टेकनाॅलाॅजीने बांधलेली आहेत. इतर काॅक्रीटने किंवा जांभा दगडाने,चि-याने बांधण्यात येणा-या टाकीच्या तुलनेत या पदधतीने बांधलेल्या टाकीचा खर्च कमी येतो