आता महावितरणतर्फे ग्राहकांना मोफत नेट मीटर मिळणार
छतावर सौरउर्जा निर्मिती प्रकल्प बसवून मोफत वीज योजनेत आता महावितरणतर्फे ग्राहकांना मोफत नेट मीटर मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आपल्या प्रकल्पात किती वीजनिर्मिती झाली व घरामध्ये किती विजेचा वापर झाला, याची अद्ययावत माहिती मोबाईल ऍपवर मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून ग्राहकांना ही सवलत देण्यात येत असल्याची माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिना तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणार्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळावे, यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे. या अंतर्गत तीन किलोवॅट पर्यंतच्या क्षमतेचे प्रकल्प बसवणार्या ग्राहकांना केंद्र सरकारकडून अनुदान मिळते.
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत वेगळा नेट मीटर बसवावा लागतो. आतापर्यंत त्याचा खर्च ग्राहकाला करावा लागत होता पण आता महावितरणने ग्राहकांना सोलर नेट मीटर विनामूल्य पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ग्राहकांचे पैसे वाचणार आहेत.www.konkantoday.com