
रत्नागिरी येथील श्री विठ्ठल मंदिरात ४ जानेवारी रोजी “निसर्गातून शिकवण, श्री दत्तगुरूंचे २४ गुरु” या विषयावर निरूपण आणि गाण्याचा विशेष कार्यक्रम
रत्नागिरी : रत्नागिरी येथील श्री विठ्ठल मंदिरात शनिवार दिनांक ४ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ३.३० ते ५ वाजता या वेळेत मुंबईतील नामवंत गायक कलाकारांचा “निसर्गातून शिकवण म्हणजे श्री दत्तगुरूंचे चोवीस गुरु” हा निरूपण आणि गाण्याचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन श्री विठ्ठल मंदिर संस्थेचे खजिनदार श्री. प्रमोद रेडीज यांनी केले आहे.श्री दत्तगुरूंनी २४ गुरूंकडून मानवाला काय घेता येईल आणि आपले आयुष्य कसे समाधानी आणि आनंदी करता येईल, हे सांगितले आहे.
निसर्गावर प्रेम करा, मग तो भरभरून देतो, ही या कार्यक्रमाची संकल्पना असून हा कार्यक्रम नुसता अध्यात्मिक नसून आयुष्य समाधानी ठेवण्यासाठी विचार करण्यास प्रवृत्त करणारा आहे. निरूपण आणि गाण्याच्या या कार्यक्रमात मिलिंद करमरकर, मंदार पारखी, माधुरी करमरकर, अदिती प्रभुदेसाई, सुवर्णा कागल घैसास, मधुरा पोतनीस हे गायक कलाकार असून तबला साथ राजेंद्र दातार आणि संवादिनी साथ संदीप मेस्त्री हे करणार आहेत. तालवाद्य संजू बर्वे आणि माधुरी पोतनीस यांचे असून निरूपण अनुपमा सबनीस या करणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना पूर्णिमा पारखी यांची आहे
या कार्यक्रमाचे संयोजक ज्येष्ठ नागरिक श्री. सुरेश विष्णू उर्फ अण्णा लिमये आणि समाजभूषण श्री. सुरेंद्र घुडे हे आहेत. या कार्यक्रमानंतर सायंकाळी ६ ते ७ वाजता या वेळेत रत्नागिरी पोलीस खात्याच्या सायबर विभागातर्फे सायबर गुन्हेगारी आणि जनतेने घ्यावयाची काळजी याविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.