कोकणातील मत्स्य उत्पादन मोठी घट! मत्स्य उत्पादन ८१ हजार मेट्रीक टनानी घटले!!
अलिबाग : कोकणातील मत्स्य उत्पादनात मोठी घट झाल्याचे शासकीय आकडेवारी वरून समोर आले आहे. मत्स्य उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ८१ हजार ८६८ मेट्रीक टनाने घटले आहे. हवामानातील बदल, परराज्यातील मासेमारी बोटींची राज्याच्या सागरी हद्दील होणारी घुसखोरी, वाढते प्रदुषण, अनियंत्रित मासेमारी यामुळे मत्स्य उत्पादनात घट झाल्याचे दिसून येत आहे.
सन २०२२-२३ मध्ये राज्यातील मत्स्य उत्पादन ४ लाख ४६ हजार २५६ मेट्रीक टन होते. यात सन २०२३-२४ मध्ये घट होऊन ते ३ लाख ६४ हजार २८८ मेट्रीक टनावर आले. म्हणजेच गेल्यावर्षीच्या तुलनेत मत्स्य उत्पादन ८१ हजार मेट्रीक टनाने घटले आहे. गेल्या पाच वर्षातील मत्स्योत्पादनाची आकडेवारी लक्षात घेतली तर, यावर्षी सर्वात कमी मत्स्योत्पादन झाले आहे. ही एक चिंतेची बाब आहे.ठाणे आणि पालघर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ४९ हजार मेट्रीक टन मत्स्य उत्पादन झाले. मुंबई उपनगरात ६१ हजार मेट्रीक टन, बृहन्मुंबई मध्ये सर्वाधिक १ लाख ३८ हजार मेट्रीक टन, रायगड जिल्ह्यात २८ हजार मेट्रीक टन, रत्नागिरीत ६९ हजार तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १७ हजार ९७६ मेट्रीक टन मत्स्य उत्पादन झाली असल्याचे दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा अपवाद सोडला तर इतर सर्व जिल्ह्यातील मत्स्य उत्पादनात घट झाल्याचे दिसून आले आहे.
महत्वाची बाब म्हणजे गेल्या पाच वर्षात पापलेट, सुरमई, शिंगाडा, घोळ, शेवंड सारख्या माश्यांच्या उत्पादनात मोठी घट होत असल्याचे दिसून येत आहे. ही एक चिंतेची बाब आहे. पुर्वी किनारपट्टीजवळ मुबलक मासे मिळत होते. आता खोल समुद्रात जाऊनही मासे मिळत नसल्याची तक्रार मच्छीमारांकडून केली जात आहे.हवामानातील सतत होणारे बदल, कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळे येण्याचे वाढलेले प्रमाण, रासायनिक उद्योगामुंळे कोकण किनारपट्टीवर वाढलेले प्रदुषण आणि अनियंत्रित मासेमारी, परराज्यातील बोटींकडून राज्याच्या सागरी हद्दीत होणारी मासेमारी ही मत्स्य उत्पादन घटण्यामागचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे.
पूर्वी किनारपट्टीवरील भागात घोळ, करंदी, बगा यासारखे मासे मुबलक प्रमाणात आढळायचे आता हे मासे खुपच दुर्मिळ झाले आहेत. बोंबील पण पुर्वी ज्या प्रमाणात मिळायचे ते मिळेनासे झाले आहेत. खाडी पट्ट्यातील अनेक मत्स्यप्रजाती आता नष्टच झाल्या आहेत. *-प्रविण तांडेल, मच्छिमार*