साहित्यिकानी प्रखर राष्ट्रप्रेमाने भारलेले लेखन आपल्या साहित्यातून करावे : उदय निरगुडकर.
मालगुंड : समाजामध्ये घडणाऱ्या निराशात्मक बाबींवर मात करण्यासाठी आणि देशाच्या संदर्भाने देश प्रेमाने भारलेली पिढी निर्माण करण्यासाठी समाजात लिहिणाऱ्या साहित्यिकांनी, प्रखर राष्ट्रवादाने भारलेले साहित्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी केले. ते कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या वतीने आयोजित वार्षिक वाङमयीन व वाङमयेतर पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये बोलत होते. ते पुढे म्हणाले की, साहित्यिकांना अनेक संस्था पुरस्कार देत असतात. मात्र कोकण मराठी साहित्य परिषदेने दिलेला पुरस्कार म्हणजे आईने आपल्या बाळाला भरवलेल्या प्रसादाच्या घासाचा शिधासमान आहे. त्यामुळे या पुरस्काराचे महत्त्व अनन्यसाधारण असून, हा पुरस्कार कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश करणे यांच्यासारख्या ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वांच्या हस्ते आणि प्रमुख उपस्थितीमध्ये आपल्याला प्रदान होत आहे. ही बाब सर्व साहित्यिक आयुष्यातील सगळ्यात मोठी घटना असल्याचे नमूद केले.
समाजामध्ये चंगळवाद मोठ्या प्रमाणामध्ये वाढला असून आज प्रत्येकाने स्वतःपुरते न बघता राष्ट्राचा विचार केला पाहिजे. यासाठी साहित्यिकांनी आपल्या समाजातील सर्वांनाच आपल्याकडे खेचून राष्ट्रप्रेम त्यांच्यात निर्माण होईल अशी रचना करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन करतानाच कोकण मराठी साहित्य परिषद आणि कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे त्यांनी यावेळी कौतुक केले. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी कोकणातील लिहित्या साहित्यिकाना प्रेरणा मिळावी यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने प्रस्ताव मागविले जातात. त्यानुसार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेल्या पुस्तकांवर मान्यवर परीक्षकाकडून पुरस्कारा1 परीक्षण केले जाते. त्यामुळे हा पुरस्कार सर्वांनाच प्रेरणा आणि आनंद देत असतो.म्हणूनच रविवार, दिनांक १७ नोव्हेंबर २०२४ रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
यावेळी सर्वप्रथम दीपप्रज्वलन करण्यात आले व त्यानंतर मान्यवरांचे स्वागत, सन्मान झाल्यावर ज्येष्ठ साहित्यिक सुरेश जोशी यांनी मागील काळात कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कारकिर्दीचा आढावा घेतला, कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ साहित्यिकांच्या कार्याचा गौरव करत अभिनंदन केले तर केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वाटचालीचा संक्षिप्त आढावा घेत असतानाच कोकण मराठी साहित्य परिषद नेहमीच नवोदित लेखकांना प्रोत्साहन देत असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी ज्या हेतूने कोकण मराठी साहित्य परिषद स्थापन केली, तो हेतू आज कोकणात सर्वत्र साहित्य चळवळ पाहून साध्य झाल्याचे वाटते. त्यामुळे सर्वांनी मिळून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्य उज्ज्वल करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे आणि स्वागत कवी केशवसुत स्मारकाचे अध्यक्ष गजानन पाटील यांनी केले.
या कार्यक्रमाला कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त प्रमुख रमेश कीर, प्रकाश दळवी, अशोक ठाकूर, प्रा. एल. बी. पाटील, उषा परब, जयु भाटकर, नलिनी खेर, दीपा ठाणेकर, मधुकर टिळेकर यांच्यासह सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा प्रतिनिधी, विविध शाखेचे पदाधिकारी, सभासद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवाशक्तीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अरुण मोर्ये, मालगुंड शाखेचे सचिव विलास राणे, सहसचिव रामानंद लिमये, खजिनदार उज्जवला बापट, सदस्य विश्वनाथ शिर्के, स्वप्नेश राजवाडकर, कुमार डांगे, अस्मिता दुर्गवळी, पवार मॅडम यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्य यांनी विशेष प्रयत्न केले.