कुवारबाव आरटीओ नाका ते रॉयल इनफिल्ड शोरुम मार्गावर मतमोजणीच्या दिवशी सर्व वाहनांना प्रवेश बंद
रत्नागिरी, दि.19- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतमोजणीच्या दिवशी वाहतुकीची कोंडी टाळण्याकरिता व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सर्व वाहनांना कुवारबाव आर.टी.ओ नाका ते रॉयल इनफिल्ड शोरुम (रेल्वे ब्रीज) या रस्त्यावर येणा-या व जाणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी आज दिले.
कुवारबाव आर.टी.ओ. नाका-कांचन हॉटेल-रेल्वे ब्रीज अलिकडे हॉटेल श्रद्धा या बोर्डा जवळून माऊली किराणा स्टोअर्स-क्लासिक ऑटो सर्व्हिस-सिद्धी फर्निचर- साक्षी फूड-महाराष्ट्र कृषी उद्यो ग विभाग कार्यालय- रॉयल इनफिल्ड शोरुम (रेल्वे ब्रीज) या पर्यायी मार्गे वाहतूक वळविण्यात यावी, असेही यात म्हटले आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतमोजणी प्रक्रिया 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत होणार आहे. मतमोजणी परिसरात वाहनांची व नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असून यावेळी पार्किंगचा प्रश्न निर्माण होवू शकतो अगर वाहतूक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. वाहतुकीची कोंडी टाळण्याकरिता मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 115 अन्वये वरील आदेश देण्यात आला. वाहतुक नियमनाबाबत जनतेस माहिती मिळावी यादृष्टीने मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 116 प्रमाणे वाहतुकीची चिन्हे उभारणेची कार्यवाही पोलीस विभागाने करावयाची आहे, असेही आदेशात नमूद केले आहे.