राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावरील केलेल्या टीकेमुळे संजय राऊत संतापले.
कोणत्या विषयावर काय बोलतो, याचे भान राहिले पाहिजे. ज्या पक्षाचा एक आमदार नाही, ती व्यक्ती शरद पवारांवर बोलते, असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुनावले आहे.राऊतांनी राज ठाकरेंना सुनावण्याची ही काही पहिलीच वेळ नाही, तर याआधी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याने राऊतांनी राज ठाकरेंची कान उघडणी केली होती. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना भान ठेवा, असा सल्लाच राऊतांकडून राज ठाकरेंना देण्यात आला होता. पण आता राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना तालुक्याचा नेता म्हटल्याने राऊत संतापले आहेत.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांचा तालुक्याचा नेता असा उल्लेख केला.
याबाबत शुक्रवारी (ता. 15 नोव्हेंबर) प्रसार माध्यमांना खासदार संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, सोडून द्या हो, शरद पवार यांच्यावर कोण बोलत आहे? तालुक्याचा नेता, गावचा नेता. शरद पवार काय आहेत, हे तुमचे सध्याचे नेते नरेंद्र मोदी, अमित शहा यांना विचारा, मग बोला. कोणत्या विषयावर काय बोलतो, याचे भान राहिले पाहिजे. ज्या पक्षाचा एक आमदार नाही, ती व्यक्ती शरद पवार यांच्यावर बोलत आहे. शरद पवारांनी राज्याचे, देशाचे 50-60 वर्ष नेतृत्व केले आहे. मोदी सरकारनेच त्यांचा पद्मविभूषण देऊन सन्मान केला. राजकारणातले भीष्मपितामह त्यांना म्हटले जाते, पण राजकारणात शुन्य कर्तुत्व असलेले लोक बोलत असतील, तर हे चांगले नाही, असे खडेबोल संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना सुनावले आहे