ढोल- ताशांच्या गजरात जुन्या कारवर अंत्यसंस्कार…

४ लाख रुपये केले खर्च; जाणून घ्या त्यामागचे कारण!

गुजरातमधील अमरिल जिल्ह्यात एका शेतकरी कुटुंबाने ढोल- ताशांच्या गजरात आपली १५ वर्षे जुनी ‘लकी’ कार विकण्याऐवजी तिला आपल्या शेतात नेऊन पुरले. संपूर्ण गाव या कार्यक्रमात सहभागी झाले असून विधीप्रमाणे पूजा करण्यात आली. अमरेलीतील लाठी तालुक्यातील पडरशिंगा गावात गुरुवारी संजय पोलारा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आपली लकी कार शेतात पुरली. यानिमित्त भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात संत आणि आध्यात्मिक नेत्यांसह आजूबाजूच्या परिसरातील सुमारे १५०० लोक उपस्थित होते.

ही घटना संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरली. कुटुंबाची लकी कार जिथे पुरली, त्यावर एक झाड लावण्यात आले. कारण, हे पुढील पिढ्यांना लक्षात राहावे, असे कुटुंबांचे म्हणणे आहे. या भव्य समारंभाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात पोलारा आणि त्याचे कुटुंबीय त्यांच्या शेतात कारसाठी खोदलेल्या खड्ड्यात मंत्रोच्चार करताना दिसत आहेत. या कारला फुलांनी आणि हारांनी सजवण्यात आले.कार जमिनीत पुरण्यासाठी पोलारा कुटुंबांनी आपल्या शेतात सुमारे १५ फूट खोल खड्डा खोदला, तसेच त्या खड्ड्यात गाडी सहज पोहोचेल, असाही उतार तयार करण्यात आला.

यानंतर गाडी त्या उतारावरून खड्ड्यात नेण्यात आली आणि त्यानंतर तिच्यावर हिरव्या रंगाची चादर टाकून कुटुंबांनी त्याची पूजा केली. यानंतर तिच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी तेथे उपस्थित पुजारी मंत्रोच्चार करत होते. त्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने कारवर माती टाकून ती कायमची पुण्यात आली. या वॅगनआर कारचा नंबर जीजे ०५-सीडी ७९२४ होता, जी पोलारा कुटुंबासाठी लकी होती.कारचे मालक संजय पोलारा सुरतमध्ये बांधकाम व्यवसाय करतात आणि कुटुंबासाठी भाग्यवान ठरलेली कार भावी पिढ्यांना आठवावी, यासाठी काहीतरी वेगळे करण्याची त्यांची इच्छा होती, असे त्यांनी सांगितले.

पत्रकारांशी बोलताना पोलारा म्हणाले, ‘मी ही कार १५ वर्षांपूर्वी खरेदी केली होती आणि तिच्या येण्याने कुटुंबात भरभराट झाली. व्यवसायात यश मिळण्याबरोबरच माझ्या कुटुंबाला मान-सन्मानही मिळाला. ही कार माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी भाग्यवान ठरली. त्यामुळे ती विकण्याऐवजी त्याच्या आठवणी कायम जपण्यासाठी मी तिला माझ्या शेतात पुरले. या समारंभासाठी एकूण चार लाख रुपये खर्च आल्याचे त्यांनी सांगितले.

हिंदू रीतीरिवाजानुसार, संत आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत समाधी सोहळा पार पडला, त्यासाठी सुमारे दीड हजार लोकांना निमंत्रित करण्यात आले आणि मेजवानीचे ही आयोजन करण्यात आले होते, अशीही माहिती त्यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button