भाजपशी फारकत घेणाऱ्यांशी आपली बांधिलकी संपली- रवींद्र चव्हाण.
विधानसभा निवडणुकीला या वेळी वेगळ्या वातावरणात सामोरे जावे लागत आहे. रत्नागिरी विधानसभा मतदार संघात भाजपशी फारकत घेणाऱ्यांशी आपली बांधिलकी संपली, त्यांच्याशी आता आपला काही संबंध नाही, असा टोला भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी बाळ माने यांना लगावला.महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि केंद्रात नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे, असे आवाहनही त्यांनी केले. शहरातील जयश मंगल पार्कमध्ये महायुतीतील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी उमेदवार उदय सामंत, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, जिल्हाप्रमुख राहुल पंडित, माजी आमदार प्रमोद जठार, अॅड. बाबा परूळेकर, अशोक मयेकर, अॅड. विलास पाटणे, विवेक सुर्वे, महिला पदाधिकारी आदी उपस्थित होते.