
काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर; दिग्गज नेत्यांसह तरुण चेहऱ्यांना संधी
मुंबई- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू झाला असून सर्व राजकीय पक्ष आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करत आहेत. आता काँग्रेसनेही आपल्या स्टार प्रचारकांची पहिली यादी जारी केली आहे. या यादीत पक्षाने ४० नावांची घोषणा केली आहे. काँग्रेसने आपल्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला सादर केली आहे. हे ४० जण महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत प्रचाराचे रान उठवणार आहेत.स्टार प्रचारकांच्या यादीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या नावांचा समावेश आहे. याशिवाय महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस कार्यसमिती सदस्य बाळासाहेब थोरात, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड, खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचीही नावे या यादीत आहेत.काँग्रेसच्या सरचिटणीस कुमारी शैलजा यांनी स्टार प्रचारकांची यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. या यादीत ४० नावांचा समावेश आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल हेही प्रचारासाठी महाराष्ट्रात दाखल होणार आहेत. हे सर्व स्टार प्रचारक महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तसेच नांदेड लोकसभा जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत.