
सीए इन्स्टिट्यूटतर्फे रत्नागिरीत मंगळवारी नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम.
रत्नागिरी: सनदी लेखापालांची (चार्टर्ड अकाउंटंट्स) शिखर संस्था दि इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या एमएसएमई आणि स्टार्ट अप कमिटीतर्फे व्यापाऱ्यांसाठी व नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी सीए ब्रँचने उद्योजक/व्यावसायिक आणि एमएसएमई आणि स्टार्ट अपमध्ये उद्योग उभा करू इच्छिणाऱ्या नवउद्योजकांसाठी मंगळवारी (ता. ८) मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला आहे.हा कार्यक्रम मारुती मंदिर येथील हॉटेल विवा एक्झीक्युटीव्ह येथे सकाळी सकाळी ९ ते १२ या वेळेत होणार आहे. कार्यक्रमाचा उद्देश विविध व्यावसायिक संधी, कौशल्य विकास आणि भांडवल उपलब्धता (अनुदान योजना) या बाबतीत जागृती करणे हा आहे. एमएसएमई कमिटीने विविध राज्य सरकारांसोबत यासाठी सामंजस्य करार केले आहेत. जेणेकरून स्टार्ट अपमधील नव उद्योजकांना व्यवसाय उभारणीत योगदान मिळू शकेल. रत्नागिरीत होणाऱ्या या सत्रात एमएसएमई आणि स्टार्ट अपमधील विविध संधी, त्या अनुषंगाने शासन आणि बँकांमार्फत होणारा पतपुरवठा आणि विविध सबसिडीच्या योजना यावर तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे.कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होईल. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बॅंक ऑफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर सागर नाईक आणि जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रकाश हणबर उपस्थित राहणार आहेत. जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेच्या अध्यक्ष सीए अभिलाषा भूषण मुळ्ये व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.