निलेश राणे शिवसेनेत परतण्याची शक्यता.
बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावंत कार्यकर्ते अशी एकेकाळी ओळख असलेल्या नारायण राणे यांनी 2005 साली शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. नारायण राणेंसोबत त्यांचे दोन्ही मुलं देखील शिवसेनेपासून दुरावली.गेल्या 19 वर्षात परिस्थिती बरीच बदलली आहे. नारायण राणे आणि त्यांची मुलं आता भाजपमध्ये आहेत. तर शिवसेनेचे दोन भाग झाले आहेत. आता तब्बल 19 वर्षांनी नारायण राणेंचे चिरंजीव निलेश राणे शिवसेनेत परतण्याची शक्यता आहेकुडाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी निलेश राणे आग्रही आहेत. मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या बैठकीत यावर चर्चा झाली. निलेश राणे शिवसेनेकडून कुडाळ-मालवणचे उमेदवार असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कुडाळमध्ये शिवसेनेचे वैभव नाईक सध्या आमदार आहेत. शिवसेनेत फुट पडल्यानंतर वैभव नाईक यांनी ठाकरेंची साथ दिली. त्यामुळे या मतदार संघावर महायुतीत शिवसेना शिंदे गटाचा दावा आहे. मात्र हा मतदार संघ भाजपला सुटावा असे राणे यांचे प्रयत्न आहेत. या मतदार संघातून राणेंचे पुत्र निलेश राणे हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांनी या मतदार संघात तयारीही सुरू केली आहेभाजपाला ही जागा मिळणे अवघड असल्यानं तोडगा म्हणून निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप त्याला दुजोरा मिळालेला नाही