रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या पुनर्बांधणीस परवानगी

रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाला शासनाने ३० वर्षाचे लीजवर जागा दिली. त्यासाठी नोंदणीकृत करार ही पार पडला. त्यानंतर वाचनालयाची जीर्ण झालेली इमारत पाडून नव्या स्वरूपात वाचनालयाची इमारत उभी रहावी. यासाठी परवानगी प्राप्त झाली असल्याची माहिती ॲड. दीपक पटवर्धन, अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय यांनी दिली. १९९१ साली जागेबाबाचे लिज मुदत संपुष्टात आली होती. ते लीज ॲग्रीमेंट परत व्हावे यासाठी प्रदीर्घ काळाची लढत अखेर वाचनालयाच्या मागणीनुसार ३० वर्षाची लीज होऊन यशस्वी संपली आणि वाचनालयाच्या इमारतीच्या नुतनीकरणाचा रस्ता मोकळा झाला. १९७२ साली वाचनालयाची मूळ इमारत उभी राहिली. त्यानंतर इमारतीचे विस्तारीकरण दोन टप्यात झाले. १९९६ साली दुसरा मजला बांधला गेला. मुळ बांधकाम लोड बेरिंग व त्यावर आर.सी.सी. स्लॅब अशी रचना होती. ही इमारत आता खूप जुनी म्हणजे ५२ वर्षाची झाली. आता ती पाडून पुर्नबांधकाम करणे अनिवार्य आहे. लिज ॲग्रीमेंट होत नसल्याने, नवीन बांधकाम परवानगी मिळत नसल्यामुळे आहे ते जुने बांधकाम व्यवस्थित ठेवण्यासाठी वाचनालयाने गांभीर्याने सतत प्रयत्न केले व इमारत सुस्थितीत राखली. मात्र आता स्ट्रक्चरल ऑडिटरनेही इमारत धोकादायक असा अहवाल दिला असून, आता पुनर्बांधणी आणि नूतनीकरण करून नव्या स्वरूपात नगर वाचनालयाची इमारत उभी करावयाची आहे. आवश्यक असणाऱ्या सर्व तांत्रिक परवानग्या प्राप्त करण्याचे काम पूर्ण झाले असून नवरात्र ते दिपावली दरम्याने नव्या इमारत बांधकामाचा शुभारंभ करण्याचा प्रयत्न आहे. रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय हे १९६ वर्षाचे महाराष्ट्रातील सर्वात जुने वाचनालय असून १ लाख १४ हजारांचा ग्रंथसंग्रह या वाचनालयाची शान वाढवत आहे. इतके जुने वाचनालय हे रत्नागिरीचे सुसंस्कृत संस्कृतीचा दाखला आहे. इतकी जुनी संस्था रत्नागिरीमध्ये अद्यावत पद्धतीने सुरू आहे ही बाब रत्नागिरीतील सुज्ञ नागरिक बंधू भगिनींसाठी अभिमानाची आहे. रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाची वास्तू नव्या स्वरूपात १ वर्षाच्या आत उभी करण्याचा मानस असून वाचनालयाकडे नवीन बांधकामासाठी ४३ लाख निधी जमा असून प्रयत्नपूर्वक ४३ लाखांचा निधी उभारला आहे. रु. २५ लाख ना. उदयजी सामंत हे उपलब्ध करून देणार आहेत. या वाचनालयाच्या नूतनीकरणासाठी ३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. दोन मजली इमारत, अंतर्गत सजावट इत्यादींचा समावेश यात असेल. आपल्या वाचनालयाची उत्तम वास्तू परत उभी रहावी यासाठी रत्नागिरीतील सुज्ञ नागरिक बंधू भगिनी तसेच इथल्या वित्तीय संस्था, कंपन्या, अन्य आस्थापना यांनी योगदान द्यावे यासाठी सर्वांना भेटून विनम्र आवाहन करणार आहे. वाचनालयाच्या नूतनीकरणाच्या कामासाठी रत्नागिरीकरांचे योगदान खूप मौलिक ठरणार आहे. आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी वाचनालयातील ग्रंथ ठेवा हा मार्गदर्शक ठरणार आहे. वाचनालयाचा हा संस्कार जागता ठेवण्यासाठी, उत्तम ग्रंथमंदिर साकारण्यासाठी सर्व रत्नागिरीकरांनी योगदान करावे असे विनम्र आवाहन करत आहे. रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाची सुंदर, सुसज्ज वास्तू उभी करण्याचा संकल्प यशस्वी करण्यासाठी हरसंभव प्रयत्न करणार ही वास्तू १ वर्षाच्या आत नवा साज घेऊन उभी करणे हेच उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून कार्यरत राहणार असल्याचे ॲड. दीपक पटवर्धन विनम्रपणे सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button