
देव्हारे येथे फासकीत अडकलेल्या बिबट्याची वनविभागाने केली सोडवणूक
मंडणगड : तालुक्यातील देव्हारे गावाच्या हद्दीत खासगी मालकीच्या क्षेत्रात देव्हारे-आतले रस्त्यानजीक फासकीत अडकलेल्या एका बिबट्यास वन विभागाने जीवदान दिले.
या संदर्भात परिक्षेत्रपाल वनाधिकारी वैभव बोराटे यांनी माहितीनुसार दि. 28 डिसेंबर रोजी मंडणगड तालुक्याचे वनपाल अनिल दळवी यांना दुपारी 4.30 वाजता फासकीत बिबट्या अडकल्याची माहिती दिली. या नंतर वनपाल मंडणगड व वनरक्षक देव्हारे यांनी तत्काळ घटनास्थळी जावून पाहणी केली असता तेथे दोन वर्षाचा नर जातीचा बिबट्या तारेच्या फासकीत अडकला असल्याचे आढळले. वनपाल खेड यांनी तत्काळ लोखंडी पिंजरा व वन्यप्राणी बचाव साहित्यासह घटनास्थळी दाखले झाले. वन्यप्राणी बचाव पथकाने लोखंडी पिंजरा लावून फासकीत अडकेल्या बिबट्या या वन्यप्राणास सुरक्षित ताब्यात घेतले. त्यानंतर पिंजर्यासह बिबट्यास खासगी वाहनांमध्ये घेऊन मंडणगड येथे आणून पशुधन विकास अधिकारी मंडणगड यांच्याकडून बिबट्याची वैद्यकीय तपासणी करुन घेण्यात आली. त्याला नैर्सगिक अधिवासात सोडण्यात आले. दरम्यान, फासकी लावल्याप्रकरणी प्रकरणी वनपाल मंडणगड यांनी अज्ञाताविरोधात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 अन्वये गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा पुढील तपास दापोलीचे परिक्षेत्र वनअधिकारी श्री. वैभव बोराटे करीत आहे.