जोपर्यंत उद्धव ठाकरे हे काँग्रेससोबत एकत्र आहेत, तोपर्यंत शिवसेना एकत्र येणार नाही-रामदास कदम.
ज्येष्ठ नेते शरद पवारांना सोडणं ही माझी चूक होती. बारामतीत घरातील उमेदवार देऊन मी चूक केली, अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडचिरोलीत बोलताना दिली.त्या विधानाचे शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी स्वागत केले आहे. नातीगोती सांभाळूनही राजकारण करता येऊ शकतं, असे सांगून दोन्ही शिवसेनेच्या एकत्रीकरणाबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कबुलीवर बोलताना रामदास कदम म्हणाले, शेवटी ही रक्ताची नाती असतात. राजकारणात गेल्यानंतर नात्यामध्ये शंभर टक्के वैमनस्यच आणायचे, हे चुकीचे आहे. नातीगोती सांभाळूनही राजकारण होऊ शकतं ना आणि हा महाराष्ट्र आहे, बिहार नाही. उलट अजितदादांच्या विचारांचे मी स्वागतच करेन.जोपर्यंत उद्धव ठाकरे हे काँग्रेससोबत एकत्र आहेत, तोपर्यंत शिवसेना एकत्र येणार नाही, असे मी मागेच सांगितले होते. आता पुलाखालून एवढं पाणी गेलं आहे की, आता दोन्ही शिवसेना एकत्र येणं अशक्य आहे, अशा शब्दांत शिवसेनेच्या एकत्र येण्याबाबत रामदास कदम यांनी भविष्यवाणी केली.रामदास कदम म्हणाले, शिवसेनेशी आमची अतूट बांधिलकी होती. पण, ती बाळासाहेब ठाकरेंशी होती, उद्धव ठाकरेंशी नव्हती. काँग्रेससोबत जाऊन बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी फारकत घेण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहेत. तेव्हा नात्याचा प्रश्न येतोच कोठे. ते नाते उद्धव ठाकरे यांनी तोडलं आहे