गणेशोत्सवात ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’ या अशास्त्रीय संकल्पना राबवू नयेत – हिंदू जनजागृती समितीची मागणी
रत्नागिरी, – पर्यावरण रक्षणाचे कारण सांगून जल, वायू आणि भूमी यांमध्ये होणाऱ्या प्रचंड प्रदूषणाकडे दुर्लक्ष करत केवळ हिंदूंच्याच सण आणि उत्सवांना लक्ष केले जात आहे. जलप्रदूषणाच्या नावाखाली धर्मशास्त्रानुसार होत असलेल्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाबाबत गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘मूर्तींदान’ आणि ‘कृत्रित हौद’ यांसारख्या अशास्त्रीय मोहिमा राबवल्या जात आहेत. अशा मोहिमांमुळे होणारी गणेशमूर्तींची घोर विटंबना थांबवण्यासाठी हिंदूंच्या धार्मिक भावनांचा आदर करून अशा संकल्पना राबवू नयेत, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन ५ सप्टेंबर २०२४ ला रत्नागिरी येथे जिल्हा प्रशासनाला हिंदू जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले. यावेळी श्री. मांगीलाल माळी, श्री. छगनलाल छिपा, शिवचरित्र कथाकार श्री. अरविंद बारस्कर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष श्री. गणेश गायकवाड, कु. अंकिता राजेशिर्के, श्री शारदा देवी मंदिर च्यरिटी ट्रस्ट तुरंबव, ता. चिपळूणचे श्री. दत्तात्रय पंडित, श्री. विजय साळवी, श्री. वसंत बंडबे, श्री. नागेश तांबे, हिंदू जनजागृती समितीचे श्री. संजय जोशी उपस्थित होते. प्रशासनाला दिलेले या निवेदनात म्हटले आहे की, १.विधीमंडळात सादर केलेल्या वर्ष २०१५-१६ च्या ‘लोकलेखा समिती’च्या अहवालात म्हटले आहे की, महालेखापालांनी निवडलेल्या ३६ नगरपरिषदांपैकी ३४ नगरपरिषदांकडून २०८.५१ दशलक्ष लिटर सांडपाणी कुठलीही प्रक्रिया न करता ‘जसेच्या तसे’ नद्या, तलाव आदी जलक्षेत्रांमध्ये सोडले जात आहे. हे प्रमाण प्रतीवर्षी वाढतच जात आहे.२.तसेच राज्यातील २१८०० मेट्रीक टन घनकचऱ्यापैकी १५००० मेट्रीक टन घनकचऱ्याची विल्हेवाट लावली जात नाही. या संदर्भात दोषी असणाऱ्या १९ नगरपरिषदांवर खटले दाखल करण्याची शिफारस शासनाला केली आहे.३.कृत्रिम हौदात विसर्जित झालेल्या गणेशमूर्ती पुन्हा नदी, समुद्र, तलाव आदी ठिकाणी टाकल्या जातात. यातून कृत्रिम हौदासाठी खर्च केलेले सर्व पैसे आणि श्रम पूर्णपणे वाया गेल्यासारखे आहे. ४.काही ठिकाणी पालिका प्रशासनच गणेश मूर्ती दानातून मिळालेल्या मुर्तींवर बुलडोझर फिरवून त्यांची विल्हेवाट लावत असल्याचे निदर्शनास आले.५.पुणे येथे तर गणेशमूर्ती कचऱ्याच्या डम्परमधून थेट नदीच्या पात्रात फेकल्याची सचित्र बातमी ‘पुणे मिरर्’ या इंग्रजी वृत्तपत्राने पहिल्या पानावर प्रसिद्ध केलेली आहे. राज्यात अन्य ठिकाणीही अशीच परिस्थिती आहे. अशाप्रकारे होणारी गणेशमूर्तींची घोर विटंबना थांबवण्यासाठी या निवेदनात प्रशासनाकडे पुढीलप्रमाणे मागण्या करण्यात आल्या आहेत.१.गणेशभक्तांकडून ‘मूर्तीदान’ प्रशासनाने वा अन्य अशासकीय संस्थांनी घेऊ नये.२.प्रतीवर्षी लाखो-कोट्यवधी रुपये खर्च करून कृत्रिम तलाव तयार करण्यात येऊ नयेत. ३.पूर्वापार धार्मिक प्रथा-परंपरेनुसार नैसर्गिक जलक्षेत्रातील मूर्तीविसर्जन करण्यास आडकाठी आणू नये.४.शाडूची माती आणि नैसर्गिक रंग यांपासून बनवलेल्या गणेशमूर्ती बनवण्यासाठी शासनाने मूर्तीकारांना प्रोत्साहन द्यावे. ५.प्रशासनाने प्रदूषणकारी कागदी लगद्याच्या मूर्तींची निर्मिती, विक्री आणि विसर्जन यांवर बंदी आणावी.