
नेत्रावती एक्सप्रेस च्या संगमेश्वर थांब्याच्या वर्षपूर्ती निमित्ताने
कोंकण रेल्वे…. भारतीय अभियांत्रिकी क्षेत्रातील एक चमत्कार! हिरव्या गार निसर्गाच्या कुशीतून धावणारी कोकण रेल्वे हे प्रत्येक कोकणवासियांचे स्वप्न प्रत्यक्षात आले ते 1998 साली!! 1998 साली प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर पहिली रेल्वे गाडी या मार्गांवरून धावली आणि त्यानंतर कोकण विकास झपाट्याने होईल अशी स्वप्न पडू लागली. ▪️एकूण 757 किमी लांबीचा हा मार्ग महाराष्ट्रातील रोह्यापासून सुरु होतो आणि कर्नाटक मधील ठोकूर ला संपतो. जवळपास 70 स्थानके असणारा हा मार्ग म्हणजे कोकण विकासाचे उघडलेले नवे द्वारच जणू… पण प्रत्यक्षात कोकणी माणसाला या मार्गांवर अपेक्षित रोजगार मिळाला का? दळणवळणाचे साधन म्हणून रेल्वेचा उपयोग झाला का?? हे सर्व मुद्दे वादाचे आहेत. कोकण रेल्वे मार्गांवरून दक्षिणेकडे किंवा उत्तरेत धडधडत जाणाऱ्या रेल्वे गाड्या पाहणे या पेक्षा मोठे सुख त्यातून मिळाले असे वाटत नाही. ▪️कोकणी माणूस नेहमी दुसऱ्याच्या सुखात स्वतःचे सुख शोधत असतो. देशाचा दक्षिण भाग मुंबईशी जोडला गेला हे त्यातल्या त्यात कोकण रेल्वेचे फलित… पण मग काही वर्ष गेल्या नंतर कोकणी माणसाला आपल्या हक्काची जाणीव होऊ लागली… गाड्यांच्या थांब्यासाठी ठिकठिकाणी संघर्ष सुरु झाला. ▪️आमच्या संगमेश्वर रेल्वे स्थानकात मांडवी एक्सप्रेस च्या थांब्यासाठी तालुका पत्रकार संघाने आंदोलन केले. त्याला यश आले. मांडवी ला थांबा मिळाला. त्यानंतर मध्ये बराच काळ लोटाला. नवीन गाड्यांच्या थांब्यांच्या मागण्या झाल्या नाहीत…. परंतु असच एक वेडा रेल्वे वर प्रेम करणारा तरुण 5 वर्षांपूर्वी आपल्या तालुक्यासाठी काही तरी करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरला आणि सर्व बाबींचा अभ्यास करून त्याने सर्वाना बरोबर घेऊन रेल्वे स्थानकातील सुधारणा, गाड्यांचे थांबे यासाठी प्रयत्न सुरु केले.संदेश जिमन असे त्याचे नाव…. नोकरी निमित्त मुंबईत स्थायिक परंतु गावाशी असणारी नाळ न तोडलेला हरहुन्नरी तरुण…. सुमारे 5 वर्षांपासून त्याने संघर्ष सुरु केला. रेल्वे स्थानका वरील स्वछता किंवा इतर गैरसोयी दूर करण्याची मागणी आणि त्याचबरोबर नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस ला संगमेश्वरला थांबा देण्याची मागणी केली. जवळपास 4 वर्ष आंदोलन व संघर्ष केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने याची दखल घेतली. आणि अखेर गतवर्षी 22 ऑगस्ट ला नेत्रावती एक्सप्रेस ला संगमेश्वर साठी हंगामी स्वरूपात थांबा देण्यात आला. ▪️तालुकावासियांसाठी ही अत्यंत मोठी गोष्ट होती. एका जिद्दी आणि मेहनती तरुणाने केलेल्या संघर्षाला यश आले होते. आज या थांब्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने एक श्री जिमन यांनी आपल्या निसर्गरम्य चिपळूण व संगमेश्वर ग्रुप तर्फे एका आनंद सोहळ्याचे आयोजन केले आहे. हा सोहळा दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी संध्याकाळी 4 वा संगमेश्वर रेल्वे स्थानकात होणार आहे.. ▪️संगमेश्वर रेल्वे स्थानाकातून रेल्वे प्रशासनाला मिळणारे उत्पन्न वाढत आहे. आगामी काळात अजून काही गाडयांना थांबा मिळण्यासाठी संदेश आणि मंडळींचा संघर्ष सुरूच आहे. देशाच्या कानकोपऱ्यात जाण्यासाठी रेल्वे हा उत्तम पर्याय आहे. अशा स्थितीत संदेश जिमन सारख्या तरुणाला तालुकाभरातून सक्रिय सहभाग मिळणे गरजेचे आहे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे तो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही, त्याला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही…. तरीही तो करत असलेले प्रयत्न हे निश्चितच कौतुकास्पद आहेत. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे रेल्वेचा फायदा कोकण वासियांना किती झाला हा मुद्दा वादाचा असला तरीही एखादी हक्काची गोष्ट आपल्याला मिळत नसेल तर सनदशीर मार्गाने संघर्ष करून ती मिळवण्याची आपण कोकण वासियांनी आता मानसिकता तयार करणे गरजेचे आहे. त्यासाठी संदेश करत असलेल्या आंदोलन किंवा प्रयत्नांना बळ देण्याची गरज आहे. तालुक्यातील प्रत्येकाने ते आपले कर्तव्य आहे असे समजून सहभागी होण्याची गरज आहे. नाहीतर देशभरातून पर्यंटक गोव्याला जाताना रेल्वे गाडीतून आपल्या कोकणातील निसर्गाचा आनंद घेतील. त्याचा फायदा आपल्याला काही नाही. गाड्यांचा थांबा हा फक्त आपल्या स्थानिकांसाठी नाही तर पर्यटनातून आपल्या तालुक्याचा विकास साधायचा असेल आणि त्यातून रोजगार निर्मिती करायची असेल तर बाहेर गावाच्या रेल्वे गाडयांना थांबे मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी या आंदोलनात तालुक्यातील प्रत्येकाने सहभागी होणे आवश्यक आहे….