म्हाडा बनावट संकेतस्थळ प्रकरणी दोघांना अटक!
म्हाडाचे बनावट संकेतस्थळ तयार करून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याची धक्कादायक बाब नुकतीच उघड झाली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत म्हाडाच्या माहिती संचार आणि तंत्रज्ञान विभागाकडून वांद्रे – कुर्ला संकुल येथील सायबर कक्षाकडे तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानुसार सायबर पोलिसांनी पुढील कारवाई करत नुकतीच याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. एकाला नालासोपाऱ्यातून तर दुसऱ्याला माहीममधून सायबर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यातील एक म्हाडाचा अधिकारी असल्याचे सांगून लोकांची फसवणूक करत असल्याचे तपासात समोर आले आहे.म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून मुंबईतील विविध ठिकाणच्या २०३० घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. या सोडतीसाठी ९ ऑगस्टपासून अर्जविक्री आणि अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच मुंबई मंडळाकडे एक तक्रार आली. त्या तक्रारीनुसार म्हाडाचे बनावट संकेतस्थळ तयार करत त्याद्वारे नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याची धक्कादायक बाब उघड झाली. संबंधित तक्रारदाराकडून ५० हजार रुपये उकळण्यात आल्याचे, म्हाडाची घरे देण्याच्या नावे फसवणूक होत असल्याचे समोर आले. तर म्हाडाच्या संकेतस्थळाची हुबेहूब नक्कल करत बनावट संकेतस्थळ तयार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. याची गंभीर दखल घेत म्हाडा प्राधिकरणाच्या माहिती संचार आणि तंत्रज्ञान विभागाकडून बीकेसी सायबर सेलमध्ये याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनुसार सायबर पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास करत अवघ्या काही दिवसातच दोन जणांना अटक केली आहे.बीकेसी सायबर सेल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री उशिरा नालासोपाऱ्यामधून एकाला तर माहीममधून एकाला अटक करण्यात आली आहे अमोल पटेल (२९ वर्षे ) आणि कल्पेश सेवक (३५ वर्षे) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणाचा सूत्रधार कल्पेश सेवक असल्याचे तपासात समोर आले आहे. कल्पेश सेवक यानेच बनावट संकेतस्थळ तयार केले होते. तर या बनावट संकेतस्थळावरील पेमेंट लिंकद्वारे पन्नास हजाराची जी रक्कम ऑनलाईन पद्धतीने अदा झाली होती ती कल्पेश सेवक यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाली होती. हाच धागा पकडत पोलिसांनी तपास केला आणि आरोपींना पकडण्यात यश मिळवले. अमोल पटेल हा आपण म्हाडाचा अधिकारी असल्याचे सांगत नागरिकांना घरे दाखवत असे आणि म्हाडाची घरे देण्याच्या नावे त्यांची फसवणूक करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.दरम्यान याप्रकरणी सायबर पोलीस पुढील तपास करत आहेत. तर अटक करण्यात आलेल्या दोघांना सहा दिवसांची पोलीस पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. म्हाडाची घरे ही सोडतीद्वारेच सोडत पूर्व आणि सोडती नंतरची प्रक्रिया पूर्ण करत म्हाडाच्या माध्यमातूनच वितरित केले जातात. त्यामुळे कुठल्याही भूलथापांना बळी न जाता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज दाखल करत म्हाडाच्या सोडतीत सहभागी व्हावे असे आवाहन सायबर पोलिसांनी नागरिकांना केले आहे.