श्रीराम मंदिर कट्ट्यातर्फे १७ ऑगस्ट रोजी भजनी कलावंत मार्गदर्शन मेळावा भजन कला मार्गदर्शक प्रकाश वराडकर बुवा करणार मार्गदर्शन
रत्नागिरी दि.१३ (प्रतिनिधी) : येथील श्रीराम मंदिरात श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्यावतीने मासिक भजनी कलावंत मार्गदर्शन मेळावा येत्या शनिवार दिनांक १७ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ३ ते ५ वाजता या वेळेत संपन्न होणार आहे. या मेळाव्यात भजन कला मार्गदर्शक भजनी बुवा श्री. प्रकाश वराडकर हे भजनी कलावंतांना शास्त्रोक्त पद्धतीने भजन कलेविषयी मार्गदर्शन करणार आहेत. आजवर त्यांनी केलेल्या दहा भजन कला मार्गदर्शन मेळाव्याना भजनी कलावंतांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. श्रावण महिन्यात विविध मंदिरातून भजनी सप्ताह संपन्न आहेत तसेच सप्टेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यात गणेशोत्सव सुरू होणार आहे. कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव जल्लोषात, भजनांच्या साथ संगतीने धूम धडाक्यात साजरा केला जातो. या कालावधीत श्री गणारायासमोर कर्णमधुर भजने, अभंग गायीले जातात. या पार्श्वभूमीवर यावेळच्या भजनी कलावंत मेळाव्याला विशेष महत्त्व असणार आहे. या मेळाव्यात गणेशोत्सव भजनाची विशेष तयारी केली जाणार आहे. तरी भजनी कलावंतांनी या मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कट्ट्याचे मुख्य संयोजक श्री. सुरेश तथा अण्णा लिमये आणि सचिव समाजभूषण श्री. सुरेंद्र घुडे यांनी केले आहे.